४०० रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:49 IST2019-06-17T23:48:59+5:302019-06-17T23:49:24+5:30
देशभरात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा प्रदान करा व कायदा करण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी संप पुकारला. त्यामुळे आएमएच्या अमरावती शाखेशी संलग्न शहरातील ४०० खासगी रुग्णालयांनी सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी बंद ठेवली. केवळ आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने अनेक नियमित रुग्णांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.

४०० रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशभरात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा प्रदान करा व कायदा करण्याच्या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी संप पुकारला. त्यामुळे आएमएच्या अमरावती शाखेशी संलग्न शहरातील ४०० खासगी रुग्णालयांनी सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण तपासणी बंद ठेवली. केवळ आपत्कालीन स्थितीत रुग्णांवर उपचार करण्यात आल्याने अनेक नियमित रुग्णांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदा आणावा, या प्रमुख मागणीसाठी आयएमएने सोमवारी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने देशभरातील डॉक्टर संपावर गेले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संपूर्ण दिवसभर वैद्यकीय तपासणी बंद करण्यात आली. अमरावतीत खासगी क्षेत्रात एकूण ४०० वैद्यकीय उपचार केंद्रे आहेत. तेथील सर्व वैद्यकीय व्यावसायिक संपात सहभागी झाले आहेत. संपकाळात केवळ अतिदक्षता विभाग, इमर्जन्सी रुग्णांनाच सेवा दिल्या गेल्याची माहिती अमरावती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक लांडे यांनी दिली. संपामुळे अमरावतीमधील सर्व खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली होती. या संपामध्ये डॉ. अशोक लांडे, डॉ. निरज मुरके, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. वसंत लुंगे, डॉ. अनिल रोहणकर, डॉ. कल्पना लांडे, डॉ. अश्विनीकुमार देशमुख, डॉ. मनीष राठी, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. अनुपमा देशमुख, डॉ. शुंभागी मुंधडा, डॉ. जागृती शहा, डॉ. दिनेश वाघाडे, डॉ. पंकज इंगळे, डॉ. रश्मी कहार, डॉ. भूपेंद्र भोंड, डॉ. संदीप दानखेडे, डॉ. राजेश शर्मा, डॉ. ऋषीकेश नागलकर, डॉ. गोपाल बेलोकार आदींनी सहभाग नोंदविला.
पीडीएमसीत पथनाट्य
देशभरात डॉक्टरांचा संप अहिंसात्मक मार्गाने सुरू आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आयएमएच्या संकल्पनेतून डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पथनाट्य हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. याशिवाय शेकडो विद्यार्थ्यांनी काळ्या फित्या लावून निषेध नोंदविला. सायंकाळी ६ वाजतापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहरातील सर्वच डॉक्टर उपस्थित होते, अशी माहिती आयएमए सचिव डॉ. नीरज मुरके यांनी दिली.