भीतीने तिने घेतले ‘रॅट किल’ अन् फुटले बलात्काराचे बिंग!
By प्रदीप भाकरे | Updated: April 2, 2023 21:10 IST2023-04-02T21:10:34+5:302023-04-02T21:10:44+5:30
१४ वर्षांची पीडिता गर्भवती : आरोपीला तत्काळ अटक

भीतीने तिने घेतले ‘रॅट किल’ अन् फुटले बलात्काराचे बिंग!
अमरावती : सामाजिक बदनामीच्या भीतीने एका १४ वर्षीय मुलीेने ‘रॅट किल’ पूड प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारार्थ दाखल करताच ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यातून तिच्यावर झालेल्या अनन्वित शारीरिक अत्याचाराचे बिंग फुटले. १ एप्रिल रोजी दुपारी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी आरोपी रवी गणेश इंगोले (२५, रा. आमला, ता. दर्यापूर) याच्याविरुद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने अटक करण्यात आली.
दर्यापूर तालुक्यातील एका गावच्या रहिवासी असलेल्या १४ वर्षीय मुलीला आरोपीने प्रेमजाळ्यात ओढले. तिला आमिष दाखविले. मात्र, नोव्हेंबर २०२२ पासून आरोपीने तिचा शारीरिक छळ सुरू केला. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दबाव टाकला तथा चार ते पाच महिन्यांपासून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. वारंवार होणाऱ्या अत्याचाराने ती अल्पवयीन मुुलगी प्रचंड घाबरली. कुटुंबीयांना सांगायचे तरी कसे, असा प्रश्न तिला पडला.
आत्महत्येचा प्रयत्न
अत्यंत विमनस्क स्थितीत पोहोचलेल्या त्या अल्पवयीन मुलीने अखेर आत्महत्येचा निर्णय घेतला. ३० मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास तिने उंदीर मारण्याची विषारी पूड प्राशन केली. हा प्रकार समजताच तिच्या कुटुंबीयांनी तिला प्रथम दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पुढे तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाचारार्थ पाठविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले अन् तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.
पोलिस व बाल कल्याण समितीला माहिती
दर्यापूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाल्याची माहिती इर्विनमधील डॉक्टरांकडून दर्यापूर पोलिसांसह बाल कल्याण समितीला देण्यात आली. समिती सदस्यांच्या उपस्थितीत पीडितेचे बयान नोंदविण्यात आले. त्यातून तिच्या शारीरिक शोषणाचा प्रकार उघड झाला. बयानानंतर दर्यापूर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
तीन दिवसांपूर्वी त्या मुलीने रॅट किल औषध घेतले होते. तिच्यावर इर्विनमध्ये उपचार सुरू असताना तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातून ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक करण्यात आली.- संतोष टाले, ठाणेदार, दर्यापूर.