नवाथे भुयारी पूल निर्मितीचे श्रेय आमचेच
By Admin | Updated: October 11, 2015 01:34 IST2015-10-11T01:34:42+5:302015-10-11T01:34:42+5:30
नवाथेनगरातील भुयारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राजकारण होत आहे.

नवाथे भुयारी पूल निर्मितीचे श्रेय आमचेच
अमरावती : नवाथेनगरातील भुयारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राजकारण होत आहे. काही जण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या पुलाच्या निर्मितीचे खरे श्रेय आमचेच असल्याचे नगरसेवक दिगंबर डहाके यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
भुयारी पुलाच्या कामासाठी या प्रभागाच्या नगरसेविका सुनीता तायडे व आपण प्रत्येकी ३० लाख असा आमच्या वाट्याला आलेला एकूण ६० लाखांचा निधी उपलब्ध केला व तत्कालीन महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी महापालिकेच्या फंडातून ४० लाख अशा एक कोटींची तरतूद केली. अशाप्रकारे एक कोटीच्या निधीतून या भुयारी पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे.
या पुलाचा कार्यारंभ ७ एप्रिल रोजी झाला व १८० दिवसांची मुदत असताना मुदतीच्या आत काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण २३ किंवा २४ आॅक्टोबरदरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे, ना. रणजित पाटील, महापौर, विरोधी पक्षनेते, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
आमचा प्रभाग, आमचाच निधी, म्हणून लोकार्पणाचा कार्यक्रमदेखील आम्हीच ठरवू. यामध्ये श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे डहाके यांनी यावेळी सांगितले.
या भुयारी पुलाची रिटेनिंग वॉल १८० मीटर लांब आहे. १७० मीटर काँक्रीट रस्ता, दोन काँक्रीट नाल्या, लायटिंगची व्यवस्था, हिरवळ आदी कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भुयारी पुलांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोण करीत आहेत याविषयीचे भाष्य त्यांनी टाळले. पत्रपरिषदेला नगरसेविका सुनीता तायडे आदी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)