धारणीतील मीनाबाजार हटविण्याचे आदेश
By Admin | Updated: August 9, 2014 00:40 IST2014-08-09T00:40:06+5:302014-08-09T00:40:06+5:30
येथील महात्मा फुले रंगभवनातील पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर पंचायत समितीचा ठराव न घेता विनापरवाना मीनाबाजार ....

धारणीतील मीनाबाजार हटविण्याचे आदेश
राजेश मालवीय धारणी
येथील महात्मा फुले रंगभवनातील पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर पंचायत समितीचा ठराव न घेता विनापरवाना मीनाबाजार अवैधरीत्या थाटून लगतच्या सात शाळांतील ४ हजार विद्यार्थ्यांचे २ महिन्यांपर्यंत शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या अवैध मीना बाजाराला तत्काळ दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी स्थलांतर करण्याचे लेखी पत्र उच्चश्रेणी १ गटविकास अधिकारी तहसीलदारांसह ग्रामपंचायतीला दिले असूनही तहसीलदाराच्या आशीर्वादाने मीनाबाजार सुरु आहे.
महात्मा फुले रंगभवनाची जागाही पंचायत समितीच्या मालकीची आहे. कोणतीही परवानगी पंचायत समितीच्या मासिक सभेच्या ठरावानुसार घेणे बंधनकारक असताना मीनाबाजारच्या संचालकाने बोगस नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारे तहसीलदारांकडून अवैधरीत्या परवानगी मिळविली. दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या मीनाबाजारालगत जि.प. उर्दू शाळा, जि.प. कन्या शाळा, ज्ञानमंदिर कन्या शाळा, कस्तुरबा, जि.प. मुलांची शाळा, कीड्स केअर कस्तुरबा विद्यालय अशा सात शाळा असून तेथे ४ हजार विद्यार्थी सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत शिक्षण घेतात. मात्र, दिवसभर सुरु असणाऱ्या मीना बाजारमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण होऊन शाळेतील विद्यार्थी मीनाबाजारात फिरत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सातही शाळांच्या मुख्याध्यापकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे २४ जुलै तक्रार रोजी दिली. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी मीनाबाजार संचालकांसह ग्रामपंचायतीचे सचिव, मुख्याध्यापकांना बोलावून चर्चा केली.
चौकशी अंती रंगभवनाची जागा पंचायत समितीच्या मालकीची असूनही अवैधरीत्या सुरू असलेल्या विनापरवाना मीनाबाजारला तत्काळ तेथून स्थलांतर करुन दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे सांगितले आणि तहसीलदारांसह ग्रामपंचायत व तहसीलदारांच्या आशीर्वादाने मीनाबाजार सुरु असल्याने ४ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे विशेष.