५०० रुपये दराची संत्री २०० रुपये क्रेट; भाववाढीची आशा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:36+5:30
अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर दरम्यान संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्रा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने मोर्शी आणि वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

५०० रुपये दराची संत्री २०० रुपये क्रेट; भाववाढीची आशा फोल
जयप्रकाश भोंडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : संत्र्याला भाव नसल्याने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ४०० ते ५०० रुपये दराची संत्री २०० ते २५० रुपये क्रेटने शेतकऱ्यांची संत्री विकली जात असल्याचे विदारक चित्र आहे.
अतिपावसामुळे जुलै ते सप्टेंबर दरम्यान संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. त्यामध्ये संत्रा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्राफळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाययोजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने मोर्शी आणि वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.
शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा पिकावर शेतकऱ्यांचा सर्वच अवलंबून आहे. या पिकावर शेतकऱ्यांचा वर्षभराचा व्यवहार चालतो. पण, त्याने दगा दिल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. या परिसरासह सातनूर, पुसला, वाई, धनोडी, मालखेड, झटामजिरी, वरूड, जरूड, लोणी, चांदस वाठोडा, सुरळी कुरळी, तिवसाघाट, बेनोडा, हिवरखेड, पुसली, मालखेड परिसरातील शेतकरी संत्रापीक मोठ्या प्रमाणात घेतात. मृग बहर फुलला नाही व आंबिया बहराच्या संत्राफळाला भाव नाही. याचमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाला. आणखी भाव वाढणार, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, आंबिया बहराची संत्री २०० ते २५० प्रतिक्रेट अशा कवडीमोल भावाने ने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवाळीनंतर भाववाढीची आशा होती. त्यामुळे अजूनही ५० टक्के शेतकऱ्यांचा माल विकला गेलेला नाही. शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी भाववाढीच्या आशेवर आहेत.
काही शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली संत्री व्यापाऱ्यांनी पावती देऊन सोडून दिली. ठरलेल्या तारखेपेक्षा अधिक दिवस होऊन बगीचाची तोड न झाल्याने शेतकरी कवडीमोल भावात संत्राफळे विकत आहेत.
बजेट कोलमडले
मोर्शी आणि वरूड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर संत्राबागा आहेत. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संत्राउत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. आंबिया बहराची फूट चांगली झाली. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने ३५ ते ५० टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. यंदा आंबिया बहराचे उत्पादन चांगले होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, टोळधाड, संत्री फळगळती, संत्राझाडाची, पानगळ, शंकु, पाने खाणारी अळी, करोना या सर्व संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.