जिल्ह्यातील संत्रा बागायतदार वाऱ्यावर

By Admin | Updated: June 17, 2014 23:58 IST2014-06-17T23:58:23+5:302014-06-17T23:58:23+5:30

गेल्या दोन दशकात संत्र्याच्या लागवडी क्षेत्रात बेसुमार वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात उत्पादनात आणि दर्जात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अनेकांना संत्र्याच्या बागा नष्ट करण्याशिवाय पर्याय राहीला

Oranges in the District | जिल्ह्यातील संत्रा बागायतदार वाऱ्यावर

जिल्ह्यातील संत्रा बागायतदार वाऱ्यावर

सुरेश सवळे - चांदूरबाजार
गेल्या दोन दशकात संत्र्याच्या लागवडी क्षेत्रात बेसुमार वाढ झाली. मात्र त्या प्रमाणात उत्पादनात आणि दर्जात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. अनेकांना संत्र्याच्या बागा नष्ट करण्याशिवाय पर्याय राहीला नाही. नागपुरी संत्रा अशी सर्वदूर ख्याती असणाऱ्या संत्रा बागाची व बागायतदारांची आजची ही दारूण अवस्था आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरूड दरम्यान १८ एकर क्षेत्रात एक विशाल सरकारी संत्रा नर्सरी आहे. या नर्सरीतून चांगल्या व जातीवंत संत्रा कळ्या पुरविण्यात येतात. पण अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याचे आजवर कोणालाच सुचले नाही. संत्रा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असतांना संत्र्याचे उत्पादन व दर्जा वाढत नाही.
सरकारी नोंदणीनुसार विदर्भात सुमारे १ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून त्यापैकी निम्मे क्षेत्र म्हणजे सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. पुर्वी वडद, मोर्शी, काटोल, कळमेश्वर याच भागात मर्यादीत असणाऱ्या संत्रा बागा गेल्या तीन-चार दशकात विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात विस्तारल्या आहेत. विदर्भातील सुमारे पाच लाख टन संत्रा उत्पादनापैकी जवळपास अडीच लाख टन संत्रा उत्पादन एकट्या अमरावती जिल्ह्यातून व्हावे हे त्याचेच प्रमाण आहे. पण या संत्र्याची गुणवत्ता व दर्जा नसल्याने तसेच प्रत्येक संत्रा झाडाला फळधारणा क्षमता रोडावल्याने एकूण उत्पादनापैकी किमान ५० टक्क्यापेक्षा अधिक संत्रा आवश्यक निकषात बसत नसल्याने तो कमी भावात विकणे भाग पडते. लहान आकारचा व दर्जा नसणाऱ्या अशा संत्रा उत्पादनासाठी विदर्भात कोल्ड स्टोरेजची सोय नसणे, संत्रा प्रक्रिया प्रकल्प नसणे ही सुध्दा मोठी समस्या आहे. झाडावरून संत्रा उतरविल्यानंतर चार दिवसात त्याची विल्हेवाट लागणे आवश्यक असते. अन्यथा तो सडण्याच्या मार्गी लागतो.
आंबिया व मृग असे संत्र्याचे दोन बहार असले तरी अमरावती जिल्ह्यात व विदर्भातही आंबियाचे उत्पादन जास्तच असते. यंदाही मृग बहाराचे उत्पादन पाच टक्केच आहे. पण आंबिया बहार चांगला असून त्याला २२०० ते २५०० प्रती हजार किंवा २२ हजार रूपये प्रती टन भाव दिला जात आहे. संत्रा पीक झाडावर असतांना संत्र्याचा बहार पाहूनच खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. सध्याचे हवामान, पाऊस, पाणी, वातावरण चांगले राहिल्यास आॅगस्ट-सप्टेंबर नंतर आंबिया मोठ्या प्रमाणात बाजारात येईल.
त्यानंतर भाव कमी-जास्त होण्याची शक्यता व्यापारी वर्गात वर्तविण्यात येत आहे. मृग बहाराचे उत्पादनच नसल्याने त्याचे भाव वाढूनही बागायतदारांना त्याचा फायदा होणार नाही. शिवाय आंबिया बहारालाही अतिवृष्टी व हवामानाचा फटका बसला तर बम्पड क्रॉप सुध्दा गमवावे लागेल अशी आजची अवस्था आहे.
आंबिया संत्रा सोबतच पंजाब प्रांतातून किन्नू नावाने येणारा संत्रा दक्षिणेतील बाजारात स्पर्धेत असते. पंजाब सरकारने या संत्र्याला मोठ्या प्रमाणात सोयी-सवलती दिल्याने तसेच दर्जा, गुणवत्ता, आकारमान यासाठी विशेष व्यवस्था केल्याने नागपुरीसंत्र्यापेक्षा किन्नू बाजारात भाव खात जातो.
व्हॅक्सीनेशन आणि कोल्ड स्टोरेज मधील साठवणूक यामुळे किन्नू फळे अधिक चमकदार, रसदार आणि हवामानाच्या धोक्यातही कायम राहतात.
संत्रा पिकाचा खालावलेला दर्जा, गुणवत्ता आणि आकारमानामुळे सुमारे सात वर्षापूर्वी दिल्ली परिसरातून आलेला संत्रा व्यापारी आता या भागातून परागंदा झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी संत्रा बागा, शेत विकत घेऊन या भागात उभारल्या होत्या. फक्त बहार विकत घेण्याएवजी अनेकांनी जमिनी खरेदी करून संत्रा पिक नगण्य भावात स्थानिक बाजारातच विकणे भाग पडू लागल्याने त्यांनी येथून काढता पाय घेतला. सध्या संत्रा व्यापारात त्यामुळेच केवळ स्थानिक व्यापारी उरले आहेत. हंगाम आला की परप्रांतिय व्यापारी येतात, धंदा करतात व निघून जातात अशीच परिस्थिती सध्या संत्र्याच्या हंगामात सुरू आहे.

Web Title: Oranges in the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.