संत्राचोरांची टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:01 IST2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:01:02+5:30
पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, संत्री कुठून आणली, याचे उत्तर तो देऊ शकला नाही. पोलिसांना संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

संत्राचोरांची टोळी अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदीदरम्यान संत्राचोरांची नऊ जणांची टोळी जेरबंद केली. मंगळवारी पहाटे अचलपूर ते चांदूर बाजार रोडवर नाका स्थित पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन चारचाकी वाहनांसह साठ कॅरेटमध्ये भरलेल्या संत्र्याचा ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शेतमालाच्या वाढत्या चोऱ्या लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी आरोपींचा शोध लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस आरोपींच्या शोधात लागले होते. यासाठी पोलिसांचे एक पथक नियमित रात्रगस्त व नाकाबंदीसाठी नेमण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी सोमवारी रात्री आसेगाव पूर्णा हद्दीतील दर्यापूर फाट्यावर एका संशयित चारचाकी वाहन (एमएच १६ एवाय ८२३१) थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्या वाहनात संत्र्याचा मुद्देमाल दिसला. तो संत्र्याचा माल विक्रीकरिता अमरावतीला नेत असल्याचे चालकाने सांगितले. मात्र, संत्री कुठून आणली, याचे उत्तर तो देऊ शकला नाही. पोलिसांना संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर तो माल सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लंपास करण्यात आल्याची माहिती पुढे आली. याचवेळी एक साथीदार मागून दुसरे वाहन घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एमएच ३१ सीएन.४८८६ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांक थांबवून चालकाची चौकशी केली. त्यानेही संत्राचोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या वाहनातून टोळीचा म्होरक्यासह नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून कलम ४१ (१),( ४) अन्वये कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीकरिता आरोपींना सरमसपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या आरोपींनी कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याची कबुली दिली असून, अन्य जिल्ह्यातही ही टोळी संत्राचोरी करीत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्याकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. व अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्यावतीने एपीआय नरेंद्र पेंदोर, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस हवालदार सुनील तिडके, सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे तसेच चालक नितेश तेलगोटे यांनी केली.
आरोपींची नावे
पोलिसांनी या गुन्ह्यात नूर शाह मोहम्मद शाह (३४), सलीम शाह अयूब शाह (३०), इमरान खान किफायत खान (२८), कलीम शाह अयूब शाह (२७), वारीस बेग जब्बार बेग (४२), फारूक अली सादीक अली (४०), शेख हाफीज शेख हारुण (१८), शेख हारूण शेख मुनाफ (३४), इरफान शाह मोहम्मद शाह (३४) (सर्व रा. बिस्मिल्लानगर) अशी आरोपींची नावे आहेत.