‘वन मॅन क्रॉन्ट्रॅक्टरशिप’ला विरोधाचे धुमारे
By Admin | Updated: March 29, 2017 00:17 IST2017-03-29T00:17:35+5:302017-03-29T00:17:35+5:30
दैनंदिन साफसफाईसाठी प्रभागनिहाय वेगवेगळे कंत्राटदार न नेमता पूर्ण शहरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा प्रस्ताव महापालिका यंत्रणेचा विचाराधीन आहे.

‘वन मॅन क्रॉन्ट्रॅक्टरशिप’ला विरोधाचे धुमारे
सत्ताधिशांना जोरदार विरोध करण्याची भूमिका : आमसभा गाजणार
अमरावती : दैनंदिन साफसफाईसाठी प्रभागनिहाय वेगवेगळे कंत्राटदार न नेमता पूर्ण शहरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याचा प्रस्ताव महापालिका यंत्रणेचा विचाराधीन आहे. मात्र या प्रस्तावाला जोरकस विरोध करण्याची भूमिका विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतली आहे. कुणा एकाच्या घशात हा कंत्राट घालण्याचा घाट यशस्वी होऊ दिल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी तथा अन्य गटनेत्यांनी घेतली आहे. आमसभेत या प्रस्तावावर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती बनविली जात आहे.
महापालिकेतील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भूमिका लक्षात घेता प्रशासनाच्या स्तरावर निर्णय न घेता हा प्रस्ताव आमसभेत ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
आमसभेत दैनंदिन साफसफाईच्या कंत्राटाबाबत धोरण निश्चित केले जाईल. त्यानंतरच प्रशासन पुढील सोपस्कार वा निविदा प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. यापूर्वी दैनंदिन साफसफाईचे कंत्राट बचतगटासह काही समाजाच्या सहकारी संस्थांना देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर आता अनेक कंत्राटदारांऐवजी एकाच कंपनीला कंत्राट द्यायचे असेल तर धोरण निश्चिती करणे अनिवार्य आहे. आमसभेत या धोरणावर होणाऱ्या प्रस्तावित चर्चेत विरोधी पक्षनेते बबलू शेखावत आणि त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचीे भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विशेष म्हणजे एकच कंत्राटदार नेमणे प्रस्तावित असल्याने आधीच्या निविदा प्रक्रियेला अर्धविराम देण्यात आला असून एकच कंत्राटदार नेमण्याची पद्धती नेमकी कशी असावी, याची पूर्वतयारी म्हणून अन्य महापालिकामध्ये जाऊन एकाच कंत्राटदाराचे फायदे -तोटे जाणून घेतले जात आहेत. एकाच कंत्राटदार असल्यास महापालिकेची आर्थिक बचत होईल, असा आशावाद आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी दैनंदिन साफसफाईसाठी ई-निविदा प्रक्रिया राबािण्यात आली. यात २२ प्रभागांपैकी १६ प्रभागांसाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक निविदा प्राप्त झाल्यात, तर उर्वरित सहा प्रभागांसाठी निविदा न आल्याने त्या प्रभागासाठी नव्याने निविदा प्रक्रिया करावी लागणार आहे. तूर्तास एकच कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असल्यान्ने प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. एकच कंत्राटदाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोनोपल्ली होईल, असा दावा करीत या प्रक्रियेला जोरकस विरोध केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
आमसभेत प्रस्ताव आल्यानंतर या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात येईल. प्रशासनाचा प्रस्ताव समजावून घेतल्यानंतर योग्य ती भूमिका ठरविण्यात येईल.
- चेतन पवार,
गटनेते, बसप, महापालिका