हजार लोकांमागे केवळ दोन आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:49+5:30
‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हटले जात असले तरी आरोग्य विभागात ही स्थिती नाही. सध्याच्या संकटकाळात डॉक्टर ते स्वच्छता कामगारापर्यंत हे ‘कोरोना वॉरिअर्स’ आहेत. त्यांच्यावर कामांचा प्रचंड ताण आहे. त्याला कारणही रिक्त पदांचा अनुशेष हेच आहे. आतापर्यंत पदभरती झालेली नाही. आता कुठे कोरोनाकाळात कंत्राटी स्वरूपात पदभरती सुरू झालेली आहे.

हजार लोकांमागे केवळ दोन आरोग्य कर्मचारी
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संकटकाळात शासन, प्रशासन व नागरिकांची भिस्त आरोग्य यंत्रणेवर असताना, या विभागातील ३१ टक्क््यांवर जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती आहे. सद्यस्थितीत एक हजार लोकसंख्येमागे केवळ दोन आरोग्य कर्मचारी आहेत. जिल्ह्यात कंत्राटी अधिकारी, कर्मचारी अन् आशा सेविकांवर महापालिका, जिल्हा परिषद व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आरोग्यसेवेचा डोलारा उभा आहे
‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हटले जात असले तरी आरोग्य विभागात ही स्थिती नाही. सध्याच्या संकटकाळात डॉक्टर ते स्वच्छता कामगारापर्यंत हे ‘कोरोना वॉरिअर्स’ आहेत. त्यांच्यावर कामांचा प्रचंड ताण आहे. त्याला कारणही रिक्त पदांचा अनुशेष हेच आहे. आतापर्यंत पदभरती झालेली नाही. आता कुठे कोरोनाकाळात कंत्राटी स्वरूपात पदभरती सुरू झालेली आहे.
जिल्ह्यात सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे २२ लाख ४१ हजार ३८८ लोकसंख्या आहे. १० वर्षांत ती किमान २८ लाख ८९ हजार झाली आहे. एवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेच्या मनुष्यबळात वाढ झालेली नाही. नियमित कर्मचारी, कंत्राटी मनुष्यबळ व आशा वर्कर गृहीत धरता, जिल्ह्यातील आरोग्य सेवेत सद्यस्थितीत जेमतेम पाच हजारांवर कर्मचारी आहेत.
आरोग्य विभागाप्रति प्रशासनाची एकंदर अनास्थाच आहे. या विभागाला राज्य शासनासह विविध योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान व तरतूद तोकडी आहे. जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या फंडातून मदत करतात. मात्र, हा निधी केव्हा मिळेल, याची शाश्वती नाही. कधी कधी तर दिलेला निधीदेखील परत घेतल्या जातो, अशी स्थिती आहे.
विविध बांधकाम, देखभाल दुरुस्ती, आस्थापना, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार यासाठीची जुळवाजुळव करताना सदोदित या विभागाची तारांबळ होत असल्याचे दिसून येते.