"आयुक्तालयात जो काम करेल तोच टिकेल!" नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी इन ‘चार्ज’
By प्रदीप भाकरे | Updated: December 21, 2022 17:30 IST2022-12-21T17:29:05+5:302022-12-21T17:30:36+5:30
सुमारे, २७ वर्षांपासून खाकीत असलेल्या रेड्डी यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर पोलीस उपायुक्तदवय सागर पाटील व विक्रम साळी यांच्याकडून आयुक्तालयाचा प्राथमिक आढावा घेतला. तथा माध्यमांशी संवाद साधला.

"आयुक्तालयात जो काम करेल तोच टिकेल!" नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी इन ‘चार्ज’
अमरावती: शहरात अवैध धंदे सुरू असतील, तर ते तातडीने बंद केले जातील. त्यावर अंकुश ठेवला जाईल, असे स्पष्ट करत आयुक्तालयात जो अधिकारी कर्मचारी काम करेल, तोच टिकेल, कामचुकारांची गय केली जाणार नाही, अशी ठाम व स्ट्रॉग भूमिका नवनियुक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. बुधवारी रेड्डी यांनी मावळत्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याकडून शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला.
सुमारे, २७ वर्षांपासून खाकीत असलेल्या रेड्डी यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर पोलीस उपायुक्तदवय सागर पाटील व विक्रम साळी यांच्याकडून आयुक्तालयाचा प्राथमिक आढावा घेतला. तथा माध्यमांशी संवाद साधला. शहर व ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे अमरावतीकरांच्या समस्या, अडचणी नेमक्या काय आहेत, ते यंत्रणेकडून समजून घेऊ. सोबतच मालमत्ताविषयक, महिला व बालकांवरील गुन्हे नियंत्रित ठेवण्यावर आपला भर असेल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात जातीय तणाव नसावा, त्यासाठी सोशल कनेक्टिव्हिटी वाढविण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोका, एमपीडीए ही आयुधे वापरली जातील. गुन्हेगारी नियंत्रणासाठी ठाणेनिहाय ‘टॉप टेन’ क्रिमिनलची यादी काढण्यात येईल, त्यांच्या हालचाली टिपल्या जातील, असेही रेड्डी म्हणाले.
विना प्रिस्किप्शन ड्रग्ज नको -
अलिकडे नशा करण्यासाठी एमडीचा वापर केला जातो. अमरावतीमध्ये तो प्रकार उघड झाला आहे. मात्र अनेक जण स्वस्तातल्या नशेकडे वळत आहेत. मेडिकलमधून विशिष्ट ड्रग्ज घेऊन त्याची नशा केली जाते. त्यामुळे मेडिकलधारकांनी नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय विकू नये, असे आवाहन सीपी रेड्डी यांनी केले. अल्प्राझोलमसारख्या काही औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन' शिवाय करता येत नाही. मात्र, कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय काही दुकानदार औषधांची विक्री करतात. यासंदर्भात आपण अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभागासह प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची समन्वय साधू, अस रेड्डी यांनी सांगितले. अमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल. औषध दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधांवर देखरेख केली जाईल.
सुधारणेकडे कल, पालकांचे समुपदेशन -
अलिकडे बालगुन्हेगारी वाढली आहे. अशा वाट चुकलेल्या बालकांसह त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाईल. त्यांना सुधरविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगतानाच सायबर गुन्हेगारांच्या, सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकू नका. ऑनलाईन व्यवहार सजगपणे करा, असे आवाहन त्यांनी केले. ‘व्हिजिबल पोलिसिंगमुळे जनतेचा खाकीवरील विश्वास वृध्दिंगत होत असल्याने तशी पोलिसिंग करण्यावर भर राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. १९९५ साली थेट डीवायएसपी म्हणून पोलीस सेवेत आलेल्या रेड्डी यांनी गडचिरोली, चंद्रपूर व परभणी येथे एसडीपीओ, औरंगाबाद व बीडचे पोलीस अधीक्षक तर, पुणे एसआरपीएफचे डीआयजी म्हणून सेवा दिली आहे. अमरावती येण्यापुर्वी ते नागपूर येथे अप्पर पोलीस आयुक्त होते.