अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:10 IST2019-01-15T22:09:52+5:302019-01-15T22:10:32+5:30
शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.

अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.
मराठवाडा व पूर्व विदर्भावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी खालावल्याने अमरावती शहरावरदेखील पाणीटंचाईचे सावट आहे. शहराला मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी अप्पर वर्धा जलाशय हे उपयुक्त आहे. इतरत्र पाणीटंचाई असताना, या धरणाने आजवर अमरावतीकरांना कधीही धोका दिला नाही, असा इतिहास आहे. परंतु, यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अप्पर वर्धा धरणाची क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर आहे. यात ११४.२२ दलघमी मृत साठा धरल्यास एकूण क्षमता ६२८.२७ दलघमीपर्यंत पोहोचतो. तथापि, सध्या धरणात १४८.३९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २६.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या दोन महिन्यांत पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.
औष्णिक विद्युत प्रकल्पाला देखील पाणी
अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठ्यासोबतच उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनाची सोय करण्यात येते. रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी धरणातून पाणी सोडले जाते. नांदगाव पेठ येथील कोळशावर आधारित रतन इंडिया कंपनीच्या सोफिया या औष्णिक विद्युत प्रकल्पालादेखील पाणी सोडण्यात येते. वीज प्रकल्प गतवर्षीपासून सुरू झाला व त्यानंतर धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात घटत गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.