अचलपुरात पेट्रोलपेक्षाही कांदे महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:32+5:30
अचलपुरात भाजीबाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो कांदा मिळत आहे. घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे एरवी किलो-किलो कांदा नेणारे दाम्पत्य एक-एक पाव कांदा विकत घेताना दिसून येत आहेत. कांदा महाग झाल्याने त्याऐवजी अनेक गृहिणी हिरवा कांदा खरेदीवर भर देत आहे.

अचलपुरात पेट्रोलपेक्षाही कांदे महाग
लोकमत न्यूज नेटवर्क
अचलपूर : कांद्याच्या भाववाढीचा फटका सर्वसामान्यांसह ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. अचलपूर येथील ५२ मोहल्ल्यातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम कांद्याने केले आहे. अचलपूरमध्ये पेट्रोलचे भाव ८० रुपये प्रतिलिटर असून, कांदा १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
अचलपुरात भाजीबाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो कांदा मिळत आहे. घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे एरवी किलो-किलो कांदा नेणारे दाम्पत्य एक-एक पाव कांदा विकत घेताना दिसून येत आहेत. कांदा महाग झाल्याने त्याऐवजी अनेक गृहिणी हिरवा कांदा खरेदीवर भर देत आहे. अचलपुरातील अनेक लहान-मोठ्या हॉटेलात, हातगाडी, टपरीवर समोस्यामध्ये कांद्याऐवजी पत्ता गोबीचा वापर वाढला आहे. भेल, आमलेट, भुर्जीमध्ये हिरव्या कांद्याचाच वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात सडली. त्यामुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे आता पेट्रोलपेक्षा कांद्याला अधिक भाव मोजावे लागत असल्याचे वास्तव आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहे. नवीन कांदा मार्केटमध्ये आल्यावर भाव कमी होईल, असे देवळीचे भाजीमंडईतील व्यापारी विशाल तिवारी म्हणाले.