कांद्याचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:45+5:30
निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

कांद्याचे भाव वधारले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: गेल्या आठवड्याभरापासून कांद्याने पाचहजारी गाठली असून क्विंटल मागे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिच्या कांद्याला ४५०० ते ५५०० हजारांचा भाव मिळाला आहे. तर निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसाने कांद्याचा पेरा खराब झाला आहे. अतिपावसाने कांदे सडत असल्याची परिस्थिती आहे. परतीच्या पावसाने सुद्धा कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कैफियत शेतकऱ्यांची आहे. त्याचे परिणाम सर्वच बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीमंडीवर झाला असून, मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लाल व पांढऱ्या कांद्याला शासकीय दर ४५०० ते ५५०० रूपये क्विंटल मिळत असल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे. व्यावसायिक दामदुप्पट भावाने विक्री करून ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पांढरा व लाल कांद्याची अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडीत किमान रोज ३० ते ४० टन कांद्याची आवक होत आहे. सोलापूर व कर्नाटक राज्यातून कांदा बाजार समितीत येत आहे. परतीचा पाऊस लांबला असला तरी जुना कांदा आता बाजारपेठेतून हद्दपार झाला आहे. नवीन कांद्याचे उत्पादन ऑक्टोंबर महिन्यात येते. मात्र आलेला नवा कांदा पावसाने सडत असल्याने मागणीच्या तुुलनेत आवक कमी झाली आहे. किमान १ जानेवारीपर्यंत कांदा महागच राहणार असल्याचा अंदाज कांदा ठोक व्यापारी सतीश कावरे यांनी वर्तविला आहे. कांद्याचे भाव २० नोव्हेंबरपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज यापूर्वी त्यांनी वर्तविला होता तो खरा ठरला आहे. यानंतरही भाववाढ कायम राहणार आहे. किमान १ जानेवारी पर्यंत खासगी बाजारात कांदा ६० ते ८० रूपये राहणार असून, शेतकºयांच्या चांगल्या प्रतिच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलचा भाव कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पावसाने कांदा सडत असल्याने आवक कमी होत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल ५५०० रूपयांचा भाव मिळाला आहे. गृहिणींना १ जानेवारीपर्यंत कांदा महागच खरेदी करावा लागणार आहे.
- सतीश कावरे,
कांदा व्यापारी अमरावती