लाचखोर लिपिकाला एक वर्षाची सक्तमजुरी
By Admin | Updated: July 24, 2014 23:37 IST2014-07-24T23:37:59+5:302014-07-24T23:37:59+5:30
एका लाचखोर लिपिकाला सातशे रुपयांची लाच स्वीकारण्याप्रकरणी येथील न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली. कैलास बाबुलाल उमाळे (५६,रा. डोंगरगाव, दर्यापूर) असे शिक्षा प्राप्त आरोपीचे नाव आहे.

लाचखोर लिपिकाला एक वर्षाची सक्तमजुरी
सात साक्षीदार तपासले : मोर्शी येथील घटना
अमरावती : एका लाचखोर लिपिकाला सातशे रुपयांची लाच स्वीकारण्याप्रकरणी येथील न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली. कैलास बाबुलाल उमाळे (५६,रा. डोंगरगाव, दर्यापूर) असे शिक्षा प्राप्त आरोपीचे नाव आहे.सीबीआयचे विशेष न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
पिंपळखुटा येथील रहिवासी विनोद प्रभाकर शिंगणे (३३) यांच्या वडिलांनी त्यांच्या भूखंडामध्ये असणारे अतिक्रमण हटविण्यासाठी मोर्शीचे नायब तहसीलदार चवरे यांच्याकडे अर्ज केला होता. चवरे यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कैलास उमाळे यांना अतिक्रमण काढण्याचे मौखिक आदेश दिले होते. परंतु अतिक्रमण काढण्यासाठी उमाळेने शिंगणे यांना १९ आॅक्टोबर २०१० रोजी दीड हजार रुपयांची लाच मागितली. शिंगणेंनी ७०० रुपये देण्याचे कबूल केले. त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात नोंदविली. ही रक्कम २० आॅक्टोबर रोजी तहसील कार्यालयात आणून देण्याचे ठरले. एसीबीने शिंंगणे यांच्याकडून ७०० रुपये स्वीकारताच पोलिसांनी उमाळेला रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून उमाळे यांना अटक केली. घटनेचे दोषारोपत्र २५ नोहेंबर रोजी येथील सीबीआयचे विशेष न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद एकुण न्यायाधिश खटी यांनी आरोपी उमाळेला लाच स्वीकारल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाकडून वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)