दीड लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी
By Admin | Updated: June 7, 2017 00:16 IST2017-06-07T00:16:02+5:302017-06-07T00:16:02+5:30
सलगचा दुष्काळ, नापिकी व शेतमालास हमीपेक्षा कमी भाव यामुळे जिल्ह्यातील एक लाखाचे आतील कर्ज असलेला दोन लाख चार हजार ४३९ शेतकरी विविध बँकांचे थकबाकीदार झाले आहेत.

दीड लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी
जिल्ह्याची स्थिती : एक लाखाच्या आतील १,५७५ कोटींचे कर्ज थकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकी व शेतमालास हमीपेक्षा कमी भाव यामुळे जिल्ह्यातील एक लाखाचे आतील कर्ज असलेला दोन लाख चार हजार ४३९ शेतकरी विविध बँकांचे थकबाकीदार झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे १,५७५ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दीड लाख शेतकऱ्यांचे किमान १२०० कोटी रूपयांचे कर्ज शासन निर्णयामुळे माफ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी जिल्ह्यात सन २०१५-१५ व २०१५-१६ या दोन्ही वर्षी दुष्काळ पडला होता. पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याने शासनाने थकीत कर्जाचे सलग पाच किस्तीमध्ये पुनर्गठन केले होते. शेतकऱ्यांना खरिपासाठी नव्याने कर्ज दिले होते. मागील वर्षीच्या हंगामात पाऊस समाधानकारक झाल्याने पीक चांगले झाले. मात्र शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे यंदा शेतकरी थकीत कर्जाचा भरणा करू शकले नाही. शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत असल्याने सातबारा कोरा करावा, ही मागणी जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मागील चार महिन्यांपासून लावून धरली आहे
एक जूनपासून शेतकरी संपावर गेला. शासन मोठ्या अडचणीत आले असताना शनिवारी शासनाने पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांचे म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
३० जून २०१६ च्या आतील एक लाखांपर्यंतची कर्ज माफ होणार असल्याची चर्चा सध्या शासनस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३० जूनपर्यंत दीड लाखांच्या आतील एक लाख ७१ हजार ५६५ शेतकऱ्यांकडे १,३९८ कोटी रुपये थकीत होते. यापैकी किमान दीड लाख शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रूपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे.
३० जून २०१६ पर्यंत थकीत बँकनिहाय शेतकरी
जिल्हा बँकेकडे ५० हजारांच्या आतील २३ हजार ८५७ शेतकऱ्यांचे ९९.३२ कोटी व एक लाखाच्या आतील २५ हजार १३३ शेतकऱ्यांचे १२०.५४ कोटी रूपयांचे कर्ज थकीत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांकडे ५० हजारांच्या आतील ८३ हजार ३६३ शेतकऱ्यांचे ६४०.९४ कोटी, व एक लाखाच्या आतील ४५ हजार १८७ शेतकऱ्यांचे ३३१.५२ कोटी रूपयांचे कर्ज थकीत आहेत.
ग्रामीण बँकांकडे ५० हजारांच्या आतील ५७५ शेतकऱ्यांचे ०.६ कोटी व एक लाखांच्या वरील ५७ शेतकऱ्यांचे ०.२५ कोटी रूपयांचे कर्ज थकीत आहे.