एक एकर शेती, तीही पाण्याखाली
By Admin | Updated: July 30, 2014 23:47 IST2014-07-30T23:47:51+5:302014-07-30T23:47:51+5:30
तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना (बाजार) येथील रामदास भेलकर यांच्याजवळ एक एकर शेती आहे. शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर पूल किंवा रपटा बांधण्यात आलेला नसल्याने लगतच्या सर्व शेतातील पाणी

एक एकर शेती, तीही पाण्याखाली
शेताचे झाले तळे : जगावं कसं? भेलकर कुटुंबाचा सवाल
अमरावती : तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना (बाजार) येथील रामदास भेलकर यांच्याजवळ एक एकर शेती आहे. शेतालगत जाणाऱ्या रस्त्यावर पूल किंवा रपटा बांधण्यात आलेला नसल्याने लगतच्या सर्व शेतातील पाणी या शेतात जमा होते. एका पावसाने शेताचा तलाव तयार झाला, सोयाबीन पाण्याखाली सडले. आता जगावं कसं, असा प्रश्न या परिवारासमोर उभा ठाकला आहे.
शेंदूरजनाबाजार ते रघुनाथपूर रस्त्यावर रामदास भेलकर यांचे शेत सर्व्हे नंबर १४७/३ एक एकर शेत आहे. या शेतावर भेलकर परिवाराची उपजिविका, लगतच्या रस्त्याचे मातीकाम व खडीकरण करताना रस्त्यावर रपटा किंवा पूल बांधण्यात आला नाही. तसेच रस्त्याच्या काठाने नाली काढण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस आल्यास लगतच्या सर्व शेतामधील पाणी भेलकर यांच्या शेतात जमा होते. शेतामधील पीक सडून जाते. यंदादेखील भेलकर यांनी सोयाबीनचे महागड बियाने, खत, पेरणी व मजुरी असे १० हजार रूपये खर्च केले, सोयाबीन पेरणीदेखील साधली होती.
पीक डौलात असताना पावसाच्या पाण्यामुळे शेतात तळ साचले.
सोयाबीन पाण्याखाली सडत आहे. भेलकर परिवाराजवळ एक एकर शेतीशिवाय उपजिवीकेचे दुसरे कुठलेच साधन नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन, विनंती, आर्जव सर्व काही झाले. शेतकऱ्यांचे नुकसान दिसत असताना यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे जगावं कसं, हा भेलकर परिवाराचा अस्वस्थ करणारा सवाल आहे. (प्रतिनिधी)