विर्शीतील वृद्धाचा कुऱ्हाडीने वार करून खून, शेजाऱ्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप
By प्रदीप भाकरे | Updated: April 18, 2023 16:46 IST2023-04-18T16:45:06+5:302023-04-18T16:46:54+5:30
सप्टेंबर २०१६ मधील घटना

विर्शीतील वृद्धाचा कुऱ्हाडीने वार करून खून, शेजाऱ्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप
अमरावती : वाडग्यातील वेल बकरीने खाल्ल्याच्या वादातून शेजाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा जीव घेणाऱ्या आरोपीला स्थानिक न्यायालयाने आजन्म कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक २ पी. जे.मोडक यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. आनंदराव सुखदेवराव बडक (५८, रा. विर्शी) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
१८ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास भातकुली तालुक्यातील विर्शी येथे खुनाची ती घटना घडली होती. हरिभाऊ शेंद्रे (५८, रा. विर्शी) असे मृताचे नाव आहे. हरिभाऊ यांच्या मालकीच्या बकरीने आनंदराव बडक याच्या वाडग्यातील कोहळा व वालाचे वेल खाल्ले. तेवढ्याच तुझ्या बकरीने माझ्या वाडग्यातील वेल खाल्ले, त्याची भरपाई कोण देणार, थांब तुला जीवाने मारून टाकतो, असे म्हणत आनंदरावने हरिभाऊ यांच्या डोक्यात व पायावर कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरड होताच आरोपी तेथून पळून गेला. जखमी हरिभाऊ यांना जिल्हा सामान्य रूग्णालयातून नागपूरला हलविण्यात आले. मात्र नागपूर येथे त्याच दिवशी रात्री ८.५५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी आधी कलम ३०७ व हरिभाऊंच्या मृत्यूनंतर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालिन ठाणेदार दत्तात्रेय गावडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
दहा साक्षीदार तपासले
याप्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कौस्तुभ लवाटे यांनी एकुण दहा साक्षीदार तपासले. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आनंदराव बडक याला हत्याप्रकरणी गुन्हेगार ठरविले. ताथ शिक्षा सुनावली. यात सहायक पोलीस उपनिरिक्षक सुधाकर माहुरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. तथा नापोकॉ अरूण हटवार यांनी कामकाजात मदत केली.