पुराने मुलांच्या स्वप्नाची धूळघाण केली !
By Admin | Updated: August 1, 2014 00:05 IST2014-08-01T00:05:44+5:302014-08-01T00:05:44+5:30
खेड येथील भारतराव तंबाखे हे भूमिहीन आहेत. मजुरीवर ते प्रपंच चालवितात. मुलगी बीएसी.सी ला शिकत आहे. दोन्ही मुलं मोर्शी येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. स्वप्नील याने नुकतीच पोलीस

पुराने मुलांच्या स्वप्नाची धूळघाण केली !
रोहितप्रसाद तिवारी - मोर्शी
खेड येथील भारतराव तंबाखे हे भूमिहीन आहेत. मजुरीवर ते प्रपंच चालवितात. मुलगी बीएसी.सी ला शिकत आहे. दोन्ही मुलं मोर्शी येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. स्वप्नील याने नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिली. या तिघाही भावांचे सर्व शैक्षणिक कागदपत्र घरकूल योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात होते.
२७ जुलै रोजी पाऊस सुरु होता. गावा शेजारुन गेलेली चारघढ नदी दुथडी वाहत होती. तथापि पुराचे पाणी बाजार ओळीत शिरेल याची जराशीही कल्पना बाजार ओळीतील नागरीकांना नव्हती. अचानक पूर वाढला, नदी काठ तोडून चारघढ नदीच्या पूराचा लोंढा बाजार ओळीत शिरला त्याने बाजार ओळीतील घरे आपल्या कवेत घेतले.
घरातील सामान नेण्याचीही उसंत पुराने दिली नाही. अंगावरील नेसत्या वस्त्रानिशी भारतराव तंबाखे कूटूंब कंबरभर पूरातून बाहेर पडले. या पुरामुळे त्यांचे घर पूर्णत: वाहून गेले. उरल्या फक्त दोन पडक्या भींती, त्या सुध्दा पुराच्या दलदलीत पडण्याच्या स्थितीत आल्या.
या पुरामुळे त्यांच्या घरातील जवळपास साडेचार क्विंटल अन्नधान्य, आणि प्रपंचाकरिता आवश्यक असलेले सर्व साहित्य वाहून गेले. पिण्याचा पेलाही त्यांच्याकडे आज शिल्लक राहिला नाही. नोकरीकरिता प्रयत्न करीत असलेल्या स्वप्नीलसह, त्यांच्या दोन्ही मुला-मुलीचे सर्व शैक्षणिक कागदपत्र सुध्दा या पुरात वाहून गेले. पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करण्यात आणि भविष्यात दुय्यम प्रतीच का? मूळ प्रती कोठे गेल्या याचे उत्तर देता-देता या कूटूंबातील मुलांच्या नाकी नउ येणार आहे. सध्या तंबाखे कुटूंब ग्रामपंचायतीच्या आश्रयाला आहे. तथापि हा आश्रय केव्हापर्यंत मिळेल याविषयी त्यांना चिंता लागली आहे.
बाजार ओळीत भविष्यातही पूर येणार असल्याचे बाजार ओळीत राहणाऱ्यांना भीती आहे, शासनाने सुयोग्य ठिकाणी त्यांना पून्हा घरकूल योजनेत घर बांधून देवून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तंबाखे कुटुंबीय करीत आहे.