नाशिकचे ‘डीपीआर’ कार्यालय अमरावतीत
By Admin | Updated: August 28, 2015 00:45 IST2015-08-28T00:45:22+5:302015-08-28T00:45:22+5:30
महापालिकेची सुधारित विकास योजना तयार करण्यासाठी नाशिक येथील उपसंचालक, नगररचना विकास योजना, ...

नाशिकचे ‘डीपीआर’ कार्यालय अमरावतीत
१८ पदांना मंजुरी : महापालिकेची सुधारित विकास योजना, ३० आॅगस्टपर्यंत डेडलाईन
अमरावती : महापालिकेची सुधारित विकास योजना तयार करण्यासाठी नाशिक येथील उपसंचालक, नगररचना विकास योजना, विशेष घटक (डीपीआर) कार्यालय अमरावतीत स्थलातंरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध संवर्गातील १८ पदांसह हे कार्यालय महापालिकेत स्थलांतरित होणार आहे.
नगर विकास विभागाचे उप सचिव सिध्दाराम सालीमठ यांनी २६ आॅगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार नाशिक महापालिकेतील उपसंचालक, नगररचना, विकास योजना, विशेष घटक हे कार्यालय अमरावतीत स्थलातंरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चमू येत्या काही वर्षांत अमरावती शहराची सुधारीत विकास योजना तयार करणार आहे. या योजनेत १५ पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला असला तरी विविध संवर्गातील एकूण १८ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास शासनाने मंजुरी दिली आहे. ६ जून २०१५ रोजी नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या निर्णयानुसार नाशिक येथील सुधारीत विकास योजना तयार करण्यासाठी हे कार्यालय स्थलांतरीत केले जात आहे. यामुळे भविष्यात अमरावती शहराचा विकास आराखडा तयार करण्यास मोठी मदत मिळेल, हे विशेष. अमरावती शहराचा स्मार्ट सीटी अभियानात समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी या कार्यालयाची भरपूर मदत मिळणार आहे. येत्या २५ वर्षाचे नियोजन करून शहराचा विकास आराखडा तयार केला जाईल. (प्रतिनिधी)