Offering tobacco, cigarettes and bidis 'here' ... Unique faith in Melghat ... | ‘येथे’ अर्पण करतात तंबाखू, सिगरेट व बिडीचा नैवेद्य... मेळघाटातील अनोखी श्रद्धा...

‘येथे’ अर्पण करतात तंबाखू, सिगरेट व बिडीचा नैवेद्य... मेळघाटातील अनोखी श्रद्धा...

ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्पाकडून दखल  ‘हँडबुक ऑफ मेळघाट’मध्ये नोंद

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील ‘बिडीवाले बाबा’, ‘तंबाखूवाले बाबा’ लोकांचे श्रद्धास्थान ठरले आहेत. बीडीवाले बाबाला बीडी, तंबाखूवाले बाबांना तंबाखू, तर सिगारेटवाले बाबाला सिगारेट प्रसाद म्हणून चढविण्याची प्रथा प्रचलित आहे. बीडीवाले बाबांची ‘हँडबुक ऑफ मेळघाट’मध्ये व्याघ्र प्रकल्पाकडून नोंद घेण्यात आली आहे.
खोंगडा वनपरिक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराच्या आत बेलकुंड रस्त्यावर राजदेवबाबा कॅम्पलगत हे बीडीवाले बाबा वडाच्या बुंध्यालगत विराजमान आहेत. त्यांनाच राजदेवबाबाही संबोधले जाते. याच मार्गावर विरुद्ध दिशेने खटकाली-पोपटखेडा मार्गावर हाय पॉईंटवर सिगारेटवाले बाबा आहेत. या सिगारेटवाले बाबाला जीनबाबा किंवा बीडीवाले बाबाही म्हटले जाते. अंबाबरवा अभयारण्यात बंदरझीरा कॅम्पच्या मागे पिपलडोल किल्ला मार्गावर तंबाखूवाले बाबा तथा तंबाखूवाला देव विराजमान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या बाबांचे अस्तित्व असल्याचे सांंगितले जाते. त्यांच्या दगडी मूर्ती, दगडी स्वरूप आजही अस्तित्वात आहेत.

कोरकू बांधवांची श्रद्धा
कोरकू बांधवच नव्हे, तर या मार्गाने ये-जा करणारे चारचाकी वाहनचालकदेखील विडी, सिगरेट, तंबाखू अर्पण केला करतात. बाबाच्या मुखात विडी किंवा सिगारेट देऊन ती पेटविली, धूर निघाला की, मनोकामना पूर्ण होते, ही श्रद्धा सर्वांमध्ये आहे.

बीडीदेव, तंबाखूदेव जागृत शक्तिस्थळं मानून त्यांना विडी, सिगारेट, तंबाखू अर्पण केला जातो. शुभकार्याची निमंत्रण पत्रिकाही दिली जाते. या स्थानाशी लोकांच्या श्रद्धा जुळल्या आहेत.
- जयंत वडतकर, अभ्यासक तथा मानद वनज्यजीव रक्षक

Web Title: Offering tobacco, cigarettes and bidis 'here' ... Unique faith in Melghat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.