लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळांमध्ये अन्न व विषबाधेच्या घटना होऊ नये, यासाठी खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित यासह महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचे पोषण आहार आणि धान्यादी वस्तू नमुन्यांची तपासणी होणार आहे. पुणे येथील एका प्रयोगशाळेकडे तपासणीची जबाबदारी सोपविली असून त्याअनुषंगाने शाळा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यांचे सोमवार, १८ ऑगस्ट रोजी पत्र धडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमध्ये ईयत्ता पहिले ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभदेण्यात येतो. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या योजनेतंर्गत ईयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच ईयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिने युक्त दुपारचे भोजन देण्यात येते. या योजनेत पुरविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनातून विषबाधेच्या घटना राज्यात घडत असल्याचे निर्दशनास आले आहे. अशा घटना घडू नये म्हणून राज्य शासनाने १ ऑगस्ट २०२५ रोजी मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे. या एसओपीचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही? याबाबत शाळांमध्ये पोषण आहार, धान्यादी वस्तू नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. नमुन्यांची तपासणी होणार असल्याने अनेक शाळा संचालकांमध्ये धडकी भरल्याचे चित्र आहे.
पुणे येथील प्रयोगशाळेची चमू प्रत्यक्षात शाळांना भेटी देत पोषण आहार आणि अन्नधान्याचे नमुने गोळा करुन ते तपासणी करतील. विद्यार्थ्यांना या माध्यमातून पोषण आहाराचा दर्जा कसा आहे, हे स्पष्ट होईल. स्वयंपाकगृहाची स्वच्छता बघितली जाईल.
महिला बचत गटाकडे आहार शिजविण्याची जबाबदारीपहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार मिळावा, यासाठी शिजविण्याची जबाबदारी त्या, त्या भागातील महिला बचत २ गटाकडे सोपविण्यात आली आहे. याविषयी शासनाने एसओपी तयार केली आहे. इंधन, भाजीपाला आणि स्वयंपाक खर्च प्रतिविद्यार्थी बचत गटाला वेगळा दिला जातो.
महापालिका हद्दीतील ६३ शाळांची चेकिंगमनपा हद्दीतील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, महापालिका शाळांमधील पोषण आहार, धान्यादी वस्तू नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. पुणे येथील शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत अनुष्का फूड अॅन्ड वॉटर टेस्टिंग प्रयोगशाळा ही संस्था शाळास्तरावर धान्यादी वस्तू आणि तयार पोषण आहाराचे नमुने संकलन करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. महापालिका हद्दीतील ६३ शाळांची चेकिंग होणार आहे.
गोदामांची देखील झाडाझडती ?प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना जून, जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे पोषण आहारासाठी तांदूळ व धान्यादी वस्तू पोहोचल्या आहेत. हा मालाचा साठा जुलैअखेर शाळांमध्ये जिल्हा पुरवठादाराकडून देण्यात आला आहे. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि पोषण आहाराची संख्या ही अनेक शाळांमध्ये तफावत दर्शविणारी आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळेतील धान्यादी वस्तू साठवून ठेवणाऱ्या गोदामांचीदेखील झाडाझडती घेतली जाणार आहे. या प्रक्रियेत अनेक शाळांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही, अशी विश्वसनीय माहिती आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार करून शाळेत विद्यार्थ्यांना वितरित केला जातो.
"गत आठ दिवसांपासून शाळांमधील पोषण आहार, धान्यादी वस्तू नमुन्यांची तपासणीचे अहवाल सादर होत आहे. दरवर्षी अशाप्रकारे नमुने घेतले जातात. मात्र, यंदा राज्य शासनाने अधिकृत पुणे येथील प्रयोगशाळा नेमली असून त्यांच्या चमूचे शेडुल्ड यायचे आहे."- डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, महापालिका