शहरात स्वच्छतागृहांची संख्या तोकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST2020-12-12T04:29:39+5:302020-12-12T04:29:39+5:30
चांदूर बाजार : ‘ना भय ना लज्जा’ असेच काहीसे उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे झाले आहे. शहरातील बाजारपेठेत स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत ...

शहरात स्वच्छतागृहांची संख्या तोकडी
चांदूर बाजार : ‘ना भय ना लज्जा’ असेच काहीसे उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे झाले आहे. शहरातील बाजारपेठेत स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत तोकडी असल्याने महिला व रस्त्याने जाणाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
उघड्यावर लघुशंका करणारे शहरात दिवसेंदिवस नजरेस पडत आहेत. शहरातील कमी मुत्रीघरांचा हा परिणाम आहे की सवयीचा भाग हा संशोधनाचा विषय झाला आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो. अस्वच्छता व दुर्गंधी पसरते यांच्याशी त्यांना काही देणेघेणे नसते. यात शहरातील स्वच्छतेची जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. त्यामुळे त्यांनी यासाठी काही उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. चांदूर बाजार शहराची बाजारपेठ चौरस क्षेत्रात आहे. यासाठी प्रत्येक रस्त्यावर काही मोजक्या अंतरावर एक स्वच्छतागृह आवश्यक आहे.
मात्र पालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठेच्या मध्यभागी एकमेव स्वच्छता गृह उभारले आहे. मात्र या स्वच्छता गृहात सतत दुर्गंधी असते. शहराची बाजारपेठ मोठी असून या बाजारपेठेच्या रस्त्यावर कुठेही स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. किमान मुख्य बाजारपेठमधील वर्दळीच्या भागात तरी अशी व्यवस्था असणे आवश्यक असते. शहरात पालिकेच्या मालकीचे पाच व्यापारी संकुल आहेत. मात्र या व्यापारी संकुलात सुद्धा एकही स्वच्छता गृह नाही. या व्यापारी संकुलात मिळेल त्या ठिकाणी नागरिक लघुशंका करीत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
पालिका करणार का उपाययोजना
या सर्व नियोजनशुन्य कारभारामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची वस्तुस्थिती आहे. सुलभ शौचालय नावालाच आहेत . आत गेल्यावर तेथील अस्वच्छतेचा परिचय अनेकांना येतो. यामुळे उघड्यावर लघुशंकेचे प्रमाण वाढण्याचे हेही एक कारण असू शकते. उघड्यावर लघुशंका केल्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. अनेकदा अशा परिस्थितीत उडालेले डास व माशा नजीकच्या हॉटेलमध्ये उघड्यावर असलेल्या खाद्यपदार्थावर बसतात. नंतर हेच खाद्यान्न ग्राहकाला देण्यात येते. शिवाय अशा परिसरातून जाणाºयांना डासांचे चावणे व त्यांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थावर बसण्यामुळे आजार वाढतात. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-----------------------