कोंडेश्वर तलावावर निर्वस्त्र तरूणांचा धुडगूस
By Admin | Updated: October 6, 2015 00:14 IST2015-10-06T00:14:00+5:302015-10-06T00:14:00+5:30
जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून परिचित असणाऱ्या श्रीक्षेत्र कोंडेश्वर येथील तलावात पोहण्यास बंदी असतानाही रविवारी काही तरूणांनी मद्यप्राशन करून नग्न अवस्थेत धुडगूस घातला.

कोंडेश्वर तलावावर निर्वस्त्र तरूणांचा धुडगूस
महिला पर्यटकांची कुचंबणा : मंदिराचे पावित्र्य धोक्यात, पोलिसांनी घ्यावी दक्षता
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून परिचित असणाऱ्या श्रीक्षेत्र कोंडेश्वर येथील तलावात पोहण्यास बंदी असतानाही रविवारी काही तरूणांनी मद्यप्राशन करून नग्न अवस्थेत धुडगूस घातला. दरम्यान ते आपसात अश्लील भाषेत संवाद साधत होते. यामुळे परिसरात येणाऱ्या तरूणी व महिलांची कुचंबणा होत आहे. या बेमुर्वतखोर तरूणांवर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याने त्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे.
श्रीक्षेत्र कोंडेश्वर हे जिल्ह्यातील जागृत व प्राचीन देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. श्रावणात येथे मोठी यात्रा भरते. वर्षभर याठिकाणी भक्तांचा राबता असतो. येथील तलाव आणि निसर्गरम्य वातावरणामुळे ‘पिकनिक’च्या दृष्टीने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. परंतु अलिकडच्या काळात या भागात सडक सख्याहरींचा राबता वाढला आहे. प्रेमी युगुलांचा अड्डाच हा परिसर बनला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तरूण-तरूणींचे अश्लील चाळे येथे सर्रास पाहायला मिळतात. आसपासच्या परिसरातूनच नव्हे तर अमरावती शहरातून काही मद्यपी व गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरूण येथील तलावात पोहण्याकरिता येतात. कोणताही धरबंध न पाळता त्यांचे वर्तन सुरू असते.
अक्षरश: नग्न अवस्थेत ते बिनधास्तपणे पोहत असतात. त्यांचे वर्तन प्रचंड आक्षेपार्ह असते. त्यांचे आपसातील संवादही तसेच अश्लील व शिवीगाळीने युक्त असतात. रविवारी हा प्रकार हमखास घडतो.
राजरोसपणे होत आहे प्रकार
बडनेरा : यामुळे परिसरात पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या महिला आणि युवतींची कुचंबणा होते. या प्रकारामुळे या देवस्थानाचे पावित्र्य देखील धोक्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच या तलावातील गाळ काढण्यात आला आहे. तलावाचे खोलीकरण करण्यात आले आहे. स्वच्छ पाणी असल्यामुळे अमरावती शहरातून पोहोण्याची हौस भागविण्यासाठी तरूण मंडळी येथे येते. रविवारी या हौशी जलतरणपटुंची जास्तच गर्दी असते. हा प्रकार अलिकडे राजरोसपणे होत असल्याने येथे येणाऱ्या महिला भाविक आक्षेप नोंदवित आहेत. कोंडेश्वर देवस्थान परिसरात जंगल वाढल्याने येथे अनेक अनैतिक प्रकार चोरट्या मार्गाने सुरू असल्याचे दिसते. हा तलाव अंजनगाव बारी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतो. ग्रामपंचायतीने या तलावात जलतरण करण्यास बंदी घातली असून तसा फलकही तेथे लावला आहे, हे विशेष. आता बडनेरा पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे.
ग्रामपंचायत, पोलिसांनी दखल घ्यावी
कोंडेश्वर येथील तलाव अंजनगाव (बारी) ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतो. एका दुर्दैवी घटनेनंतर या ग्रामपंचायतीने तलावात पोहण्यास सक्त मनाई केली आहे. तसे फलकही तलाव परिसरात लावले आहेत. मात्र, याउपरही तरूणांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी याठिकाणाकडे लक्ष देण्यासाठी ‘सीआरओ व्हॅन’ व चिडीमार विरोधी पथक नेमले आहे. परंतु प्रत्यक्षात त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बडनेरा पोलिसांनी तलाव परिसरात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
तलावात पोहणाऱ्या आणि परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या सडक सख्याहरींवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी ‘सीआरओ व्हॅन’ व छेडखानी विरोधी पथक नेमले आहे. ज्यांच्या अखत्यारीत हा तलाव येतो, त्या अंजनगाव बारी ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी.
- ज्ञानेश्वर कडू
पोलीस निरीक्षक, बडनेरा