लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शासकीय कामकाजासाठी तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारून सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो; परंतु यापुढे अर्जदारांना आपल्या दाखल अर्जाची माहिती मिळविण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. त्यासाठी तहसील प्रशासनाने शासकीय व्हॉट्सअॅप क्रमांक प्रसारित केला असल्याने आता नागरिकांना घरबसल्या आपल्या अर्ज तक्रार व सूचनेच्या सद्यःस्थितीची माहिती प्राप्त होणार आहे.
तहसील कार्यालयात सोमवारी उपविभागीय अधिकारी मिन्नू पी.एम. यांच्या हस्ते जनतेच्या सोयीसाठी प्रसारित करण्यात आलेल्या ९३०७४९६१४८ या व्हॉट्सअॅप क्रमांकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. मयूर कळसे, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, प्रशांत देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून, बांधावरून उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण व्हावे व शेतकऱ्यांना उचित माहिती प्राप्त व्हावी, यासाठी महसूल विभागाच्या दालनासमोर अर्जाच्या नमुन्यासह इत्थंभूत माहिती असलेला फलक लावण्यात आला आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून, यामध्ये गुंतवणूक प्रसार, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, ई-ऑफिस व 'एआय'बाबत प्रशिक्षण, आरोग्य व रक्तदान शिबिर, तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना समुपदेशन होणार आहे. नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांनी केले.
"जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध शासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर शासनाकडून यापुढे जनसेवेचे आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील."- मिन्नू पी.एम., (भा.प्र.से.) एसडीओ.
"शेतकरी खातेदारांनी वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद न घालता सलोख्याने राहावे. शेतरस्त्याची प्रत्येक शेतकऱ्याला गरज असल्याने परस्परांमध्ये समन्वय ठेवून एकमेकांना सहकार्य करावे."- आशिष नागरे, नायब तहसीलदार (महसूल)