महिला बचत गटांना आता ‘आॅन दि स्पॉट’ कर्ज
By Admin | Updated: March 8, 2017 00:07 IST2017-03-08T00:07:27+5:302017-03-08T00:07:27+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांसाठी सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज त्वरित मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे.

महिला बचत गटांना आता ‘आॅन दि स्पॉट’ कर्ज
महिलांना दिलासा : डीआरडीएचा आयसीआयसीआय बँकेशी करार
अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिला बचत गटांसाठी सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज त्वरित मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बचत गटांतील महिलांना कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. परिणामी बचत गटांना दिलासा मिळण्याची शक्यता यामुळे व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत एकूण ८ हजार ४४१ बचत गट आहेत. सन २०१७ साठी या विभागाला ६२७ नवीन बचत गट सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. बचत गटांना कर्ज उपलब्ध करून घेणाऱ्यासाठी चकरा माराव्या लागत होत्या. यासोबतच विविध कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी महिलांचा बराच वेळ वाया जात होता. अनेक भेटीतून शाखा व्यवस्थापकाची भेट झाली, तर महिलांना पुढची तारीख देऊन वेळ मारून नेत होते. त्यामुळे महिला त्रस्त होत होत्या. मात्र या निर्णयामुळे चित्र बदलणार आहे. डीआरडीएने यासाठी वरिष्ठ स्तरावररून नोव्हेंबर २०१६ मध्ये आयसीआय बँकेशी बचत गटातील महिलांना या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे. त्यासंदर्भात जिल्हास्तरावर शाखा व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. बॅक शाखा व्यवस्थापक वा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती मंजूर झालेल्या बचत गटांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.बचत गटाची कागदपत्र, नियमित व्यवहार,तसेच बँकेतील ठेव पाहून त्वरित बँकेतील ठेवीच्या आठपट कर्ज मंजूर केले जाणार आहे. यावेळी बचत गटांतील महिलांच्या आधार कार्डासह इतर कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. जे बचतगट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतील, अशा बचत गटांना या योजनेंतर्गत इतर बँकेतून शून्य टक्के तर आयसीआय बँकेतून २ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. याचा बंद असलेल्या बचत गटांना कर्ज देण्यासाठी बॅकांत स्पर्धा लागणार आहे. (प्रतिनिधी)
डीआरडीएतर्फे तालुकानिहाय कर्जवाटपाचे नियोजन
सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत तालुकानिहाय कर्जवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये अमरावती १९८, भातकुली १९८, नांदगाव खंडेश्र्वर १९८, चांदूररेल्वे १९८, धामनगाव रेल्वे १९७, तिवसा १९८, मोर्शी १९८, वरूड १९८, अचलपूर १९८,चांदूरबाजार १९८,दर्यापूर १९६, अंजनगाव सुर्जी १९८, चिखलदरा १९८, धारणी १९८ यानुसार २ हजार ७६६ बचत गटांना कर्ज वाटपाचे नियोजन आहे.
महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेसोबतच आयसीआय बँकेशीही करार झाला आहे. सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदान योजनेंतर्गत जमापुंजीच्या आठपट कर्ज थेट जागेवरच मंजूर होणार आहे. मात्र एडीएसवाय योजनेचे थकीबाकीदार असलेल्या बचत गटांना मात्र याचा लाभ थकीत कर्ज निल केल्याशिवाय मिळणार नाही.
- क्रांती काटोले, प्रकल्प संचालक, डीआरडीए