आता वाहनांकरिता वेगमर्यादा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:01 IST2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:01:07+5:30
याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १०० किलोमीटर प्रतितास व घाटात ५० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा.

आता वाहनांकरिता वेगमर्यादा निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात सुमारे ३० टक्के प्राणांतिक अपघात हे वाहनचालकांनी भरधाव वेगाने वाहन चालविल्याने होतात. त्यामुळे वाहनांना वेगमर्यादा घालून देणारी अधिसूचना वाहतूक पोलीस विभागाने जारी केली आहे. रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते, चढउतार आदी बाबींचा विचार करून महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १०० किलोमीटर प्रतितास व घाटात ५० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा. चारहून अधिक मार्गिका व विभाजक असलेल्या महामार्गावर समतल भागात ९० व घाटातून ५० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा सांभाळावी. या वाहनांनी महापालिकेच्या क्षेत्रातील द्रुतगती मार्गावर व सहा मार्गिका असलेल्या विभाजित रस्त्यावर समतल भागात ८० व शहरी क्षेत्रात घाट असल्यास ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ओलांडू नये. राष्ट्रीय किंवा राज्य दोन किंवा अधिक मार्गिका असलेल्या महामार्गावर विभाजक नसल्यास किंवा महानगरी क्षेत्रातील विभाजित रस्ते असल्यास समतल भागात ७० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगाची मर्यादा ठेवावी. नगरपालिका क्षेत्रात समतलमधील मर्यादा ६० व घाटातील ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित केली आहे.
मालमोटारी व नऊ प्रवासी वाहनांसाठी वेग मर्यादा
मालमोटारी तसेच वाहनचालकासह नऊ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांंची वाहतूक करणाºया वाहनांसाठी वेगमर्यादा जवळपास सारखी आहे. अशा वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावर समतलमध्ये ८० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास महत्तम वेग ठेवावा. चारहून अधिक मार्गिका व विभाजक असलेल्या महामार्गावरही हीच वेगमर्यादा असेल. महानगरी क्षेत्रातील द्रुतगती सहा मार्गिका असलेल्या विभाजित रस्त्यावर समतलमध्ये ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर दोन किंवा अधिक मार्गिकेच्या विभाजक नसलेल्या किंवा महानगरी क्षेत्रातील विभाजित रस्त्यात समतलमध्ये ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितासची मर्यादा आहे. नऊ प्रवासी वाहनांनी नगरपालिका क्षेत्रात समतलमध्ये ५० व घाटात ३० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा सांभाळावी. नगरपालिका क्षेत्रात मालमोटारींना समतलमध्ये ४० व घाटात ३० किलोमीटर प्रतितास मर्यादा सांभाळणे आवश्यक आहे.
दुचाकी वाहने
दुचाकी वाहनांना चार मार्गिका विभाजित रस्त्यावर समतल रस्त्यावर प्रतितास ७० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. महानगरी सहा किंवा चार मार्गिका विभाजित द्रुतगती रस्त्यावर तसेच दोनहून अधिक जास्त मार्गिकेच्या राष्ट्रीय, राज्य महामार्गावर दुचाक्या समतलमध्ये प्रतितास ६० व घाटात ४० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील.