आता ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान
By Admin | Updated: June 19, 2014 23:37 IST2014-06-19T23:37:06+5:302014-06-19T23:37:06+5:30
ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल, यावर उपाययोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्यावतीने पाणी अव्यवस्थापनासाठी आता पाणी

आता ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान
अमरावती : ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी कसे साठवता येईल, यावर उपाययोजना म्हणून ग्रामविकास विभागाच्यावतीने पाणी अव्यवस्थापनासाठी आता पाणी साठवा आणि गाव वाचवा अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पाणी वाचवा, गाव वाचवा या अभियानाची निश्चित योजना तयार करण्यासाठी जलतज्ज्ञ, सेवाभावी संस्थांच्या सदस्य, कल्पक उपक्रमामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
या अभियानासंदर्भात गाव पातळीवर अस्तित्वात असलेल्या मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, खडकाची पाणी पातळी व साठवण क्षमता याचे निश्चित नियोजन केले जाणार आहे.
संबंधित गावातील तलाव, विहिरींच्या पाण्याच्या पातळीचे मोजमाप करुन पाणी स्त्रोताच्या पद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे. या संपूर्ण घटकाच्या अभ्यास अहवालाचे नियोजन आराखडा या माध्यमातून तयार केला जाणार आहे.
ज्या ग्रामपंचातींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा केला जातो अशी गावे प्राधान्याने सहभागी व्हावीत यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय समितीने धोरण ठरवणे व वार्षिक आराखडा निश्चित करणे अपेक्षित आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रमाची अंमलबजावणीची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुक्यांची जबाबदारी पंचायत समितीचे बीडीओ यांची असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर कामांची तपासणी करुन शिफारस केलेल्या ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावर पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. या अभियानाचा कालबाह्य कार्यक्रम १५ जून ते १५ आॅक्टोबर असा आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत ग्रामपंचायतींकडून तालुकास्तरावर पंचायत समितीकडे अर्ज पाठविण्याची मुदत देण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०१५ पर्यंत जिल्हास्तरीय स्पर्धाकरिता उत्सुक व पात्र ग्रामपंचायतींचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाकडे पाठविण्याकरिता मुदत ठरविण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करणार आहेत. १० एप्रिल २०१५ रोजी पुस्कार वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)