आता संपूर्ण शहरात एलईडीचा प्रकाश
By Admin | Updated: May 11, 2017 00:08 IST2017-05-11T00:08:51+5:302017-05-11T00:08:51+5:30
: महानगरपालिका क्षेत्रात एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

आता संपूर्ण शहरात एलईडीचा प्रकाश
‘ईईएसएल’सोबत करार : राज्यातील पहिली महापालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरपालिका क्षेत्रात एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प राबविण्याकरिता केंद्र शासनाच्या ‘ई.ई.एस.एल.’ (एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लि.)या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा करार व प्रकल्प कार्यान्वित करणारी राज्यातील अमरावती ही पहिली महापालिका आहे.
ई.ई.एस.एल. ही केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची संयुक्त उद्यम कंपनी आहे. त्यातर्गंत महापालिका क्षेत्रातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील एलईडी दिवे लावले जातील. मे अखेरीस हजार दिवे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावल्यानंतर होणाऱ्या ऊर्जा बचतीमधून प्रकल्प खर्चाची परतफेड केली जाईल. एलईडी दिवे लावल्यानंतर साधारणत: ५० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. प्रकल्पामध्ये ऊर्जा बचतीत अनुषंगिक उपाययोजना करणे, पथदिव्यांची वेळ, चालू व बंद करण्याची व्यवस्था स्वयंचलित करणे आणि देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आदींचा समावेश आहे. सात वर्षांसाठी प्रकल्प काळात लावलेल्या दिव्यांची देखभाल व दुरूस्ती ई.ई.एस.एल. कंपनीकडे राहील.
सदर प्रकल्पाचा कालावधी सात वर्षांचा असून खर्चाचा महापालिकेवर आर्थिक भार येणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, आयुक्त हेमंतकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली महापालिका प्रकाश विभाग प्रयत्नरत आहेत.