आता उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पहिलाच उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:07 IST2020-01-29T21:06:51+5:302020-01-29T21:07:00+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे.

आता उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पहिलाच उपक्रम
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे. या प्रस्तावाला कुलगुरूंनी तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार देणारे राज्यात हे विद्यापीठ पहिले ठरणार आहे. विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९ पासून महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत मंजुरी दिली. मात्र, महाविद्यालये पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात माघारली आहेत. ३९४ पैकी १४४ महाविद्यालयांनीच पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत विद्यापीठाकडे अहवाल पाठविले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उर्वरित २५० संस्थाध्यक्ष, प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
दरम्यान, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने पदवी वितरण समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांचा गौरव करावा, यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार बहाल केला जाणार आहे. यात २०१९ या वर्षातील पदवी वितरण समारंभ ग्राह्य धरण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी पाठविलेल्या पदवी वितरण समारंभ अहवाल पुस्तक रूपात तयार करण्याचे प्रस्तावित आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.
समिती तयार करणार नियमावली, अटी
पुरस्काराच्या अटी, नियमावली तयार करण्याची जबाबदारी कुलगुरूंनी गठित के लेल्या समितीकडे सोपविली आहे. महाविद्यालयाचा परिसर, पदवी वितरणाचे स्वरूप, मान्यवरांची उपस्थिती, सामाजिक, शिक्षणक्षेत्राची व्याप्ती आदी बाबींचा यात समावेश असेल. समितीने तयार केलेला अहवाल परीक्षा मंडळ आणि पुढे व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे. एकदा व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान करताच महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण समारंभाची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप वाढीस लागावे, यासाठी पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मानस आहे. कुलगुरूंनी त्यास मान्यता प्रदान केली आहे. आता काही औपचारिक बाबी शिल्लक असून, मेपर्यंत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण केला जाणार आहे.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.