लग्नसमारंभात आता ५० जणांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:01:08+5:30
सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभात वर-वधूसह ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. खुले लॉन, मंगल कार्यालय उघडल्यानंतर तसेच हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे.

लग्नसमारंभात आता ५० जणांना परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लॉकडाऊन व संचारबंदीत आता टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यामध्ये आता विवाह समारंभासाठी ५० व्यक्तींना सहभागी होता येईल. मात्र, शासन व प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केले.
सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात विवाह समारंभ हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडता येणार आहे. विशेष म्हणजे, लग्न समारंभात मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. विवाह समारंभात वर-वधूसह ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. खुले लॉन, मंगल कार्यालय उघडल्यानंतर तसेच हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. याशिवाय दर तीन तासांनी संबंधित कार्यालयाचे काऊंटर निर्जंतुकीकरण करावे. खुले लॉन, विनावातानुकूलन मंगल कार्यालये, सभागृहांत काम करणाºया कर्मचाऱ्यांनी लोकांचा संपर्क टाळावा व सर्वांनी हातमोजे, मास्क, हँडवॉश, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आवश्यकता भासल्यास तसेच कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ संबंधित कर्मचारी, कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी. आजारी व्यक्तींना कामांवर ठेवू नये. मंगल कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एक मीटर अंतर ठेवणे बंधनकारक आहे. विवाह समारंभात येणाऱ्या व्यक्तींना कोरोना संसर्गापासून बचावाबाबत सूचना दर्शनी भागात लावण्यात याव्यात आदी अटी-शर्तींवर जिल्हाधिकाऱ्यांनी विवाह समारंभात ५० जणांना सहभागी करण्यास परवानगी दिली आहे. सहभागी व्यक्तींना आरोग्य सेतु अॅप वापरणे बंधनकारक आहे. कंटेमेंट झोनमधील कुठल्याही व्यक्तीला या समारंभात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे आढळून आल्यास मनपा आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे. कंटेनमेंट झोन परिसरात २०० मीटर अंतरापर्यतची सर्व लॉन, मंगल कार्यालये बंद राहतील.
परवानगी घ्यावी लागणार
वर-वधुपक्षाकडून आमंत्रित केलेल्या व विवाह समारंभात सहभागी होणाºया लोकांची यादी परवानगीसाठी शहरी भागात महापालिका आयुक्त, नागरी क्षेत्रात नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. लग्न समारंभात गर्दी होऊन कोविड-१९ चा प्रादुर्भाव होणार नाही, या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना देखरेख व नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही संबंधित लॉन, मंगल कार्यालयाच्या संचालकांवर राहणार आहे. विवाह समारंभात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सभागृहात गर्दी झाल्यास याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला संचालकांनी द्यावी तसेच मंगल कार्यालय तात्काळ बंद करावे. असे न केल्यास प्रशासन ‘अॅक्टिव्ह मोड’वर येऊन संबंधित लॉन, मंगल कार्यालय सील करण्याची प्रक्रिया पार पाडेल, असे या आदेशात म्हटले आहे.