फसव्या जाहिरातीमुळे अमरावतीतून सात दूरचित्रवाणी वाहिन्या अन् इंदूरच्या कंपनीला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:14 IST2017-11-24T17:14:19+5:302017-11-24T17:14:37+5:30
जर तुम्ही टकलामुळे त्रस्त असाल, तर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पाहा, असा संदेश देणा-या जाहिराती मनोरंजन करणा-या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकत असतात.

फसव्या जाहिरातीमुळे अमरावतीतून सात दूरचित्रवाणी वाहिन्या अन् इंदूरच्या कंपनीला नोटीस
वैभव बाबरेकर
अमरावती : जर तुम्ही टकलामुळे त्रस्त असाल, तर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पाहा, असा संदेश देणा-या जाहिराती मनोरंजन करणा-या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकत असतात. या जाहिराती ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट १९५४ चे उल्लंघन असल्याचे बजावत अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) च्या अमरावती कार्यालयाने सात टीव्ही वाहिन्या आणि इंदूर येथील कंपनीच्या संचालकाला नोटीस पाठवली आहे. त्यांच्याविरोधात सातत्याने लोकांच्या तक्रारी येत होत्या.
ठरावीक वयात टक्कल पडणे हे स्वाभाविक आहे. याशिवाय त्याला आनुवांशिक कारणेही जबाबदार असतात. तथापि, यावर उपाय म्हणून आमच्याकडे मॅजिकल रेमेडी आहे आणि त्याचे भरपूर चांगले रिझल्ट दिसून येतील, असा दावा करीत फिरणा-या जाहिराती टीव्ही वाहिन्यांवर सातत्याने प्रसारित होत असतात. त्यामध्ये एखाद्या चमत्काराप्रमाणे टकलावर केस उगवलेले दाखविले जाते.
वास्तविक, केस पुन्हा प्राप्त करण्यासाठी काही प्रक्रिया असू शकतील, मात्र त्यामध्ये एवढ्या झटपट केस उगवू शकत नाहीत, हे कुणीही सांगू शकेल. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींचे प्रसारण रोखले जावे, अशा मागण्या वेळोवेळी एफडीए कार्यालयाला प्राप्त होत आहे. त्याच्या अनुषंगाने इंदूर येथील सदर कंपनी व टकलावरील इलाजाच्या जाहिराती प्रसारित करणा-या सात कंपन्यांना याच महिन्यात नोटीस पाठविण्यात आली आहे.
सदर जाहिरातींचे प्रसारण हे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अॅक्ट १९५४ चे उल्लंघन आहे. त्यामुळे अमरावती कार्यालयाने वाहिन्यांसह इंदूर येथील उत्पादकाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
- पी.एन. शेंडे
सहआयुक्त (औषध)
अन्न औषध प्रशासन, अमरावती