नोटपॅड, टॅबच्या जमान्यात पाटीचा पडला विसर
By Admin | Updated: July 7, 2015 00:09 IST2015-07-07T00:09:55+5:302015-07-07T00:09:55+5:30
पूर्वीच्या काळात दप्तर आणि पाटी विद्यार्थ्यांची खरी ओळख मानली जात असे.

नोटपॅड, टॅबच्या जमान्यात पाटीचा पडला विसर
विद्यार्थ्यांची खरी ओळख अडगळीत : अक्षरातूनच होतेय शैक्षणिक भविष्य
रोशन कडू तिवसा
पूर्वीच्या काळात दप्तर आणि पाटी विद्यार्थ्यांची खरी ओळख मानली जात असे. मात्र संगणक युगात ही खरी ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसता येत नाही. मात्र या गिरवलेल्या अक्षरातूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आकाराला येत होते.
नोटपॅड आणि टॅबच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहापुढे पालकांनादेखील पाटीचा विसर पडला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील विद्यार्थ्यांची खरी ओळख असणारी पाटी अडगळीत पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाटीवर ‘अ ब क ड’, ‘ग म भ न’ काढून अभ्यासाचा श्रीगणेशा केला जात असे. मात्र संगणक युगात ही पाटी ‘कोरीच’ राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘क’, ‘ख’, ‘ग’ पासून पाढे, गणित या पाटीमुळेच विद्यार्थ्यांना समजत असत. आता या पाट्यांची जागा वह्या व टॅबने घेतली आहे. या पाटीवर सराव करता करता सुवाच्य अक्षराचा कित्सा आपोआप गिरवला जात होता. शाळा सुरु होण्यापूर्वीच शालेय साहित्याची खरेदी सुरु होते. या सर्व साहित्यामधून पाटी मात्र अडगळीत पडली आहे.
याबाबत शालेय साहित्य विक्रेत्याला विचारणा केली असता पूर्वीच्या तुलनेत पाटीची मागणी कमी झाल्याचे सांगितले. आता विद्यार्थी पहिलीपासूनच पाटी वापरत नाहीत. बहुतांश विद्यार्थी वऱ्ह्या किंवा दोन वऱ्ह्यांचा वापर करीत आहेत. मराठी शाळांमधून अजूनही पहिली व दुसरीचे विद्यार्थी पाटीचा वापर करतात. या पाटीची काळजी घेतली जात असे. पाटी स्वच्छ करण्यासाठी कोश्याचा किंवा ओल्या रबरचा वापर केल्या जात असे. काही वर्षांनंतर पाटीचा वापर कमी कमी होत गेला. या पाटीचा संबंध मानवी जीवनाशी इतक जोडला गेला की, एखाद्याची पाटी कोरी राहिली, अशी म्हण रुढ झाली. आता मात्र ही पाटी खरोखरच कोरी राहणार आहे.
पाटी रूपडे पालटते आहे
काळानुरुप पाटीसुद्धा आपले रूप पालटत आहे. सध्या बाजारपेठेत ४० रुपयांपासून पाट्या उपलब्ध आहेत. राजा स्लेट, साधी प्लेट असे दोन प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सर्वांना जुनी खापराची पाटी आठवते. ही पाटीच सध्या दुकानातून नामशेष झाली आहे. दोन दशकांपूर्वी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात या खापराच्या पाटीपासून मुळाक्षरे गिरवून होत असे.
मराठीची पाटी फुटली
अस्तित्वात असलेल्या मराठी शाळांना अव्हेरुन गल्लीबोळात इंग्रजी शाळा बोकाळल्या आहेत. शासनाने इंग्रजी शाळांना परवानगी देण्याचा सपाटा लावला आहे. पालकांना वेगवेगळी आमिषे दाखवून मराठी शाळांतील विद्यार्थी पळविण्याचा सपाटा या इंग्रजी शाळांनी लावला आहे. त्यामुळे मराठी शाळा दिवसेंदिवस ओस पडू लागल्या आहेत.