सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट
By जितेंद्र दखने | Updated: July 15, 2023 20:26 IST2023-07-15T20:25:35+5:302023-07-15T20:26:26+5:30
विभागात १०५८ अँड्राईड तिकीट मशीन दाखल : वाहक झाले स्मार्ट

सुट्या पैशांचे टेन्शनच नाही; मोबाईलने काढा लाल परीचे तिकिट
अमरावती : एसटीच्या ईटीआयएम मशीनमध्ये वारंवार होणारे बिघाड, सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहकांमधील तू-तू मै-मै आता इतिहासजमा होतील. कारण लाल परीमध्ये महामंडळामार्फत अमरावती विभागातील आठ आगारांमध्ये १०५८ अँड्राईड तिकीट मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे वाहकही स्मार्ट झाले असून खिशात रोख पैसे नसतानाही एसटीतील प्रवाशांना आता आपल्या मोबाईलवरील गुगल -पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून डिजिटल तिकीट काढता येणार आहे.
सदोष मशीनमुळे अनेकदा एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी असताना कोऱ्या कागदावर तिकीट लिहून देण्याची वेळ वाहकांवर येते हाेती. त्यामुळे महामंडळानेही वाहकांच्या डोक्याला तापदायक ठरलेल्या या यंत्रांना बायबाय करून अँड्राईड ई-तिकीट मशीन आणल्या. जिल्ह्यातील सर्वच आगारातील वाहकांना या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक अँड्राईड ई-तिकीट मशीनमुळे लाल परीचे वाहक हायटेक झाले आहेत. एसटीमधील गर्दी लक्षात घेता प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणार आहेत.
आगारनिहाय अशा मिळाल्या मशीन
विभागातील अमरावती आगाराला १६७, बडनेरा १११, चांदूर बाजार ११३, चांदूर रेल्वे १०९, दर्यापूर १४८, मोर्शी १०४, परतवाडा १६३, वरूड १४३ अशा एकूण १ हजार ५८ आधुनिक अँड्राईड ई-तिकीट मशीन उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत आगारस्तरावर वाहकांचे प्रशिक्षण झाले. नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीन ही चार्जर व मशीन कव्हरसह पुरविण्यात आली आहेत.
अमरावती विभागातील आठ आगारांकरिता १०५८ नवीन अँड्राईड ई-तिकीट मशीन प्राप्त झाल्या आहेत. येत्या आठवड्यात प्रवाशांना आपल्या मोबाईलवरील गुगल-पे, फोन पे, कार्ड पेमेंटच्या माध्यमातून या मशीनद्वारे प्रवासाचे भाडे चुकविता येईल तसेच याच डिव्हाइसमधून सुटे पैसे दिल्यास डिजिटल तिकीटदेखील काढता येईल.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक