खाद्यपदार्थ नव्हे, नानाविध आजारांचीच विक्री!
By Admin | Updated: August 6, 2014 01:28 IST2014-08-06T01:16:21+5:302014-08-06T01:28:51+5:30
उपाहारगृह, हॉटेल्सच्या किचनमध्ये अस्वच्छतेचा कळस

खाद्यपदार्थ नव्हे, नानाविध आजारांचीच विक्री!
अकोला: पावसाळ्य़ाचे दिवस..दमट वातावरण..कीटकजन्य आजारांना वाट करून देण्यासाठी पोषक वातावरण..माशांचा संचार.. अशा परिस्थितीत हॉटेल्सच्या अस्वच्छ किचनमध्ये तयार झालेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारणे म्हणजे आजार विकत घेण्यासारखेच आहे. अकोला शहरातील अनेक हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये अस्वच्छ वातावरणातच खाद्यपदार्थ बनविले जातात. यासंदर्भात लोकमतने शहरातील निवडक हॉटेल्सची पाहणी केली असता, बहुतांश हॉटेल्सचे किचन अस्वच्छ आढळून आले. अकोला शहरातील उपाहारगृह आणि हॉटेल व्यवसायिक त्याच्या किचनच्या (स्वयंपाकगृह) स्वच्छतेबाबत कितपत काळजी घेतात, याचे स्टिंग ऑपरेशन लोकमतने सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस केले. हॉटेल आणि उपाहारगृहांच्या किचनमध्ये लोकमत चमूच्या सदस्यांनी पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. मळकट कपडे घातलेले स्वयंपाकी (कुक), घाणीने माखलेले ओटे, बाजूलाच कचर्याचे ढीग, तळण्यासाठी वापरण्यात येणारी गंजलेली भांडी, जळलेले तेल आणि निकृष्ट धान्य व पालेभाज्यांचा वापर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी होत असल्याचे आढळून आले. भांडी धुण्याची जागा शौचालयापुढे, पाण्याची टाकी महिनोगणती स्वच्छ न झाल्याने त्यात साचलेले शेवाळ आणि ग्राहकांना पाणी देणारे वेटर्स टाकीतच हात बुडवून ग्राहकांपुढे पाण्याचे ग्लास ठेवत असल्याचे किळसवाणे चित्र अनेक हॉटेल्स आणि उपाहारगृहांमध्ये पहावयास मिळाले.