शिक्षकांद्वारे गैरमार्गाचा अवलंब
By Admin | Updated: September 25, 2015 00:57 IST2015-09-25T00:57:58+5:302015-09-25T00:57:58+5:30
शहरातील बहुतांश शाळांमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी मणिबाई गुजराती हायस्कूल व २३ सप्टेंबरला गोल्डन किड्स स्कूलमध्ये चाचणी पार पडली.

शिक्षकांद्वारे गैरमार्गाचा अवलंब
अमरावती : शहरातील बहुतांश शाळांमध्ये पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी मणिबाई गुजराती हायस्कूल व २३ सप्टेंबरला गोल्डन किड्स स्कूलमध्ये चाचणी पार पडली. शहरातील सेंट फ्रान्सिस स्कूलमध्ये २४ सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत बहुतांश शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, शहरातील काही शाळांमध्ये पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित दिली जात असल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे. या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीतील प्रश्नांची लेखी उत्तरे देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे तात्पुरते हित साधले जात असले तरी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र दूरगामी अप्रिय परिणाम होणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया कच्चा राहू नये यासाठी शासनाने त्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्याकरिता चाचण्यांचे नियोजन आखले आहे. मात्र विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना असा गैरमार्गाचा अवलंब करण्यास शिकविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकच असे गैरप्रकार करीत असतील, तर शैक्षणिक दर्जा उंचावणार कसा? असाही प्रश्न निर्माण होतोच.
पायाभूत चाचणीचे गुणाकंन आॅनलाईन
प्रत्येक शाळेत शासनाच्या आदेशानुसार पायाभूत चाचणीला सुरुवात झाली आहे. या चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुणांकन शासनाला आॅनलाईन कळविण्यात येणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी अभ्यासात मागे असतील, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे या पायाभूत चाचण्यांना महत्व आहे.