फोटो पी २६ गोटाळी
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मेळघाटात करण्यात आली. मात्र, महिला वनकर्मचाऱ्यांसाठी चेक पोस्टवर आवश्यक असलेले शौचालय बांधण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब एका वर्षापूर्वी नव्याने उघडण्यात आलेल्या गोटाळी चेक पोस्टवर उघड झाली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पूर्वी सिपना, गुगामल, आणि अकोट वन्यजीव, असे तीन विभाग होते. मागील दोन वर्षांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सीमा वाढल्याने नव्याने चौथा मेळघाट वन्यजीव विभाग अस्तित्वात आला. त्यात जामली, घटांग, गाविलगड, अकोट (खटकाळी पोपटखेडा) धूळघाट अशा सहा वनपरिक्षेत्र बीट आहे. परतवाडा येथे मेळघाट वन्यजीव विभाग या नावाने कार्यालय सुरू आहे. उपवनसंरक्षक म्हणून महिला अधिकारी पीयूषा जगताप कार्यरत आहेत.
तत्कालीन निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्प फाउंडेशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली. मात्र, जंगलात क्षेत्रीय रक्षण करणाऱ्या कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधाच नाही. विशाखा समित्या कार्यरत असल्याचे श्रीनिवास रेड्डी यांनी उत्तर दिले होते. प्रत्यक्षात महिलांच्या समस्या जैसे थे असल्याने त्यांनी तयार केलेल्या समित्या कागदावरच थांबल्या का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेळघाट वन्यजीव विभागाच्या जामली (आर) वनपरिक्षेत्र अंतर्गत गतवर्षी चेक पोस्ट उभारण्यात आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अती संरक्षित जंगलातून वन उपज किंवा वन्य प्राण्यांची हत्या करून तस्करी होऊ नये हाच मुख्य उद्देश तपासणी नाक्यांचा आहे. २४ तास येथे कर्मचारी हजर राहतात. पुरुष कर्मचाऱ्यांसोबत, महिला कर्मचारी सुद्धा आहे. त्या महिलेसाठी आवश्यक असलेले शौचालय व सुविधाच नाही. मेळघाट फाउंडेशन किंवा नवीन व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभागाची पुनर्रचना करताना कोट्यवधी रुपयांचा खर्च त्यात झाला. परंतु महिला कर्मचाऱ्यांसाठी सुविधा देण्याचे वरिष्ठ अधिकारी विसरले. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना जंगलात किंवा इतर आडोशाला जावे लागत असल्याचे वास्तव आहे.
कोट
गोटाळी फाटा चेकपोस्ट एक वर्षापूर्वी उभारण्यात आला. तेथे शौचालय व इतर कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
- अभय चंदेले, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी
जामली मेळघाट वन्यजीव विभाग