रेल्वे गाड्यांमध्ये दिवाळीत ‘नो रुम’

By Admin | Updated: October 24, 2015 00:17 IST2015-10-24T00:17:40+5:302015-10-24T00:17:40+5:30

दिवाळी उत्सवात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसून ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘नो रुम’ असे आरक्षण खिडक्यांवर फलक झळकू लागले आहेत.

'No Room' in Diwali ' | रेल्वे गाड्यांमध्ये दिवाळीत ‘नो रुम’

रेल्वे गाड्यांमध्ये दिवाळीत ‘नो रुम’

स्पेशल गाड्यांची प्रतीक्षा : १ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
अमरावती : दिवाळी उत्सवात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसून ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘नो रुम’ असे आरक्षण खिडक्यांवर फलक झळकू लागले आहेत. उत्सवादरम्यान ये-जा कशी करावी, असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे रेल्वे आरक्षण दलालांची चलती दिसून येत आहे.
दसरा आटोपला असला तरी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. गत १५ दिवसांपासून रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असे चित्र आहे. दिवाळी उत्सवानिमित्त रेल्वे आरक्षण मिळविण्यासाठी १२० दिवसांपूर्वीच प्रवाशांनी आरक्षण खिडक्यांवर धाव घेतली होती. मात्र ज्यांना आरक्षण मिळाले ते आनंदीत राहिले, तर ज्या प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण मिळाले नाही अशांनी दलालांकडे रेल्वे आरक्षण तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. दलालांनी अव्वाच्या सव्वा रक्कमेची मागणी केल्यामुळे सामान्य प्रवाशांनी रेल्वे आरक्षण घेण्याचे टाळले, ही वस्तुस्थिती आहे. नोकरी, खासगी व्यवसाय, कंपन्यात कार्यरत असलेल्यांना गावी जाण्याकरीता रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्यामुळे दिवाळीत घरी उत्सवासाठी कसे जावे, हा सवाल अनेक प्रवाशांसमोर उपस्थित झाला आहे. रेल्वे आरक्षणाची परिस्थिती लक्षात घेत खासगी ट्रॅव्हर्ल्स संचालकांनीसुद्धा पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आदी प्रमुख शहरांमध्ये प्रवासाचे दर वाढविले आहे. रेल्वेत आरक्षण हाऊसफुल्ल अशी परिस्थिती असल्यामुळे अनेकांनी दिवाळीत घरी न गेलेले बरे या मन:स्थितीत आले आहेत. ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान कमालीची गर्दी असून रेल्वे गाड्यांमध्ये ७०० ते ८०० वेटिंग लिस्ट आहे. नोव्हेंबर महिन्यात रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या विशेष गाड्या सुरू होण्याचे संकेत
दिवाळी उत्सवादरम्यान काही विशेष गाड्या सुरु करण्याचे रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. या विशेष गाड्यांकडे प्रवाशांची मेहेर नजर लागली असून तारखेची प्रतीक्षा अनेक प्रवासी करीत आहेत. एलटीटी ते हटीया, मुंबई ते नागपूर, पुणे ते कामक्या (गुवाहाटी), पुणे ते नागपूर ( व्हाया पनवेल) अशा चार विशेष गाड्या सुरु होतील, असे संकेत मिळत आहे. मात्र रेल्वे संकेत स्थळावर या गाड्यांची माहिती अद्यापपर्यंत टाकण्यात आलेली नाही. विशेष गाड्यांची माहिती प्रवाशांना खऱ्या अर्थाने १ नोव्हेंबरनंतरच मिळू शकेल, असे बोलले जात आहे.

मुंबई, हावडा, पुणे, अहमदाबाद व दिल्लीमार्गे ये- जा करणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. वातानुकू लित, सामान्य आरक्षण ‘नो रुम’ आहे. विशेष गाड्यांसंदर्भात अजूनपर्यंत काहीच माहिती नाही.
- व्ही. डी. कुंभारे,
निरीक्षक, वाणिज्य विभाग रेल्वे अमरावती.

Web Title: 'No Room' in Diwali '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.