‘नो पार्किंग झोन’मध्ये ठेकेदाराकडूनच वसुली
By Admin | Updated: October 5, 2015 00:35 IST2015-10-05T00:35:17+5:302015-10-05T00:35:17+5:30
अंबानगरीची मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकच नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करतात.

‘नो पार्किंग झोन’मध्ये ठेकेदाराकडूनच वसुली
रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष : नागरिकच करतात नियमांचे उल्लंघन
संदीप मानकर अमरावती
अंबानगरीची मॉडेल रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकच नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करतात. परंतु नो-पार्किंग झोनमधील वाहन चालकांकडून ठेकेदारांचे कर्मचारी पठाणी वसुली करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु या बाबीकडे रेल्वे पोलीस कमालीचे दुर्लक्ष करीत असून रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही अवैध वसुली सुरू असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे.
खान नामक ठेकेदाराला भुसावळ डी.आर.एम. आफिसच्यावतीने तीन वर्षांसाठी रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्थेचा कंत्राट दिल्याचे समजते. हा कंत्राट १४ लाख रुपयांत रेल्वे विभागाने तीन वर्षांकरिता ठेकेदाराला दिल्याची माहिती आहे. नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात वाहन आणल्यानंतर अधिकृत पार्किंग झोनमध्ये वाहने लावणे नियमाने गरजेचे आहे. त्याकरिता ५ ते १५ रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क स्वीकारण्यात येते. काही नागरिक नियमांचे पालन करतात. पण काही नागरिक थेट रेल्वे स्टेशनच्या नो पार्किंग झोनमध्ये राजरोसपणे आपली वाहने लावतात. पण येथे कार्यरत असलेले जी.आर.पी. आर.पी.एफ.चे पोलीस त्यांना कधीही हटकत नाही.
पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने एवढ्या मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात रेल्वे पोलीस अपयशी ठरत आहेत. ठेकेदारांचेही १४ लक्ष रुपयांचे उद्दिष्टे पूर्ण न झाल्यामुळे त्यांना नो पार्किंग झोनमध्ये जाऊन नागरिकांकडून पैसे घेण्यास भाग पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु ही वसुली नियमबाह्य असून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
वसुली करण्यासाठी नेमले कर्मचारी
नो पार्किंग झोनमध्ये वाहन चालकांकडून प्रत्येक वाहनांचे ५ ते १० रुपयांपर्यंत पठाणी वसुली करण्यात येते. त्या करिता सदर ठेकेदाराने रोजंदारीने कर्मचारी नेमले आहेत. ते कधी पावत्या देतात, तर कधी देत पण नाहीत. प्रवाशांना व त्यांच्या नातेवाईकांना घाई असते त्यामुळे ते विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
नो पार्किंग झोनमध्ये प्रवाशांनी वाहन लावणे चुकीचे आहे व बाहेरच्या लोकांकडून व ठेकेदारांकडून नो पार्किंग झोनमधील वाहन चालकांकडून पैसे घेणे नियमबाह्य आहे. हा मुद्दा बैठकीत अनेकवेळा मांडण्यात आला आहे. दोेषीविरुध्द कारवाई करण्यात येईल.
- बी.पी. गुजर,
स्टेशन प्रबंधक, अमरावती.