‘नो पार्किंग’मध्ये वाहने 'जैसे थे'
By Admin | Updated: May 27, 2016 00:29 IST2016-05-27T00:29:52+5:302016-05-27T00:29:52+5:30
तहसील कार्यालयात नो पार्किंग झोनमध्ये नागरिकच बेशिस्तपणे वाहने लावत आहेत. यावर कुणाचाही अंकुश नाही.

‘नो पार्किंग’मध्ये वाहने 'जैसे थे'
कारवाई केंव्हा ? : तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत वाहनांची रांग
संदीप मानकर अमरावती
तहसील कार्यालयात नो पार्किंग झोनमध्ये नागरिकच बेशिस्तपणे वाहने लावत आहेत. यावर कुणाचाही अंकुश नाही. या वाहनधारकांवर तहसीलदार सुरेश बगळे यांनी कारवाईचा बडगा उगारून ही वाहने बाहेर काढण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा आहे.
येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने तहसीलच्या आतील परिसरातच ठेवण्यात येतात. हे तहसील कार्यालय अनेक वर्षांपूर्वीचे आहे. येथे तहसील अधिकृत पार्किंग व्यवस्था करायला हवी. पूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळे त्या लोकसंख्येनुसार, तहसीलचे बांधकाम व परिसराची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता अमरावती तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे येथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते. नागरिक येथे बेवारसपणे कुठेही वाहने उभी करून निघून जातात. त्यामुळे तहसीलदाराच्या व उपविभागीय अधिकारांच्या दालनांपर्यंत वाहनांच्या रांगा अस्ताव्यस्त स्थितीत दिसून येतात. यावरून अशा नागरिकांकरिता नियम आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिताही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असली पाहिजे. परंतु ते नसल्यामुळे तेसुध्दा वाटेल तेथे वाहने ठेवण्याचा प्रताप करतात. त्यामुळे तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जर अशी व्यवस्था असेल तर इतर कार्यलयांचे काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. परंतु तहसीलदार सुरेश बगळे यांनी ही बेशिस्त पार्किंग काढण्यासाठी पुढाकार घेतला तर एका दिवसात ही समस्या निकाली निघू शकते. परिसरात ज्या ठिकाणी वाहने ठेवायचे आहे त्या ठिकाणी अधिकृत दुचाकी पार्किंग झोनचे फलक लावल्यास नागरिक व महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी वाहने ठेवतील. यानंतरही नो पार्किंग झोनमध्ये वाहने ठेवल्यास त्यांच्यावर कारवार्इंचा बडगा उगारायला हवा.
तहसीलच्या बाहेरही प्रवेशव्दाराजवळ बेशिस्त वाहने ठेवली जातात त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथे वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा येथे गोंधळाची स्थिती राहणार आहे.