मेंढपाळांनाही वनहद्दीत ‘ नो- एंट्री ’

By Admin | Updated: August 5, 2014 23:14 IST2014-08-05T23:14:51+5:302014-08-05T23:14:51+5:30

अमरावती वनविभागातंर्गत समाविष्ट पाच वनपरिक्षेत्रात वनविभागाने काठेवाडी आणि मेंढपाळ व्यावसायिकांच्या जनावरांना जंगलात ‘नो- एंट्री’ केली आहे. त्यामुळे या नव्या निर्णयाने मेंढपाळविरुध्द्ध वनविभाग अशी

'No-Entry' for Wildlife | मेंढपाळांनाही वनहद्दीत ‘ नो- एंट्री ’

मेंढपाळांनाही वनहद्दीत ‘ नो- एंट्री ’

गणेश वासनिक - अमरावती
अमरावती वनविभागातंर्गत समाविष्ट पाच वनपरिक्षेत्रात वनविभागाने काठेवाडी आणि मेंढपाळ व्यावसायिकांच्या जनावरांना जंगलात ‘नो- एंट्री’ केली आहे. त्यामुळे या नव्या निर्णयाने मेंढपाळविरुध्द्ध वनविभाग अशी ठिंणगी पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र यंदाच्या हंगामात चराई पासेस देताना स्थानिकांच्या हक्काचा वनविभागाने विचार केला आहे.
जिल्ह्यात मेळघाट वगळता उर्वरित १२ तालुक्यात ३१ हजार मेंढ्या तर १५ हजार काठेवाडी गुरे असल्याची वनविभागात नोंद आहे. या गुरांची संख्या बघता जंगल तोकडे, गुरे जास्त अशी स्थिती असल्याने अमरावतीच्या उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी ३० जुलै रोजी काठेवाडी व मेंढपाळ जनावरांना कोणत्याही परिस्थिीतीत वनविभागाच्या हद्दीत प्रवेश देवू नये, असे निर्देश एका पत्राव्दारे संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. परिणामी वडाळी, मोर्शी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात काठेवाडी आणि मेंढपाळांच्या गुरांना चराई पासेस देताना पेच निर्माण झाला आहे. या तिनही वनपरिक्षेत्रात काठेवाडी व मेंढपाळांची गुरे अधिक संख्येने असल्याने चराई पासेस देताना वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपालांना राजकारणाचे बळी पडावे लागत आहे. परंतू काहीही झाले तरी स्थानिकांचा हक्क जोपासण्याचे निर्देश वरिष्ठ वनअधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांच्या गुरांना चारा मिळावा, यासाठी वनविभागाने वनक्षेत्राचे वर्गिकरण केले आहे. ‘अ’ व ‘क’ वर्गिकरणानुसार वनक्षेत्रातील ५१ हजार ४४३ हेक्टरपैकी २८ हजार १८८ हेक्टर क्षेत्र चराईसाठी उपलब्ध करुन दिले आहे. चराईकरिता राखीव वनक्षेत्रात वर्तुळ अधिकाऱ्यांना चराई पासेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र या चराई पासेस काठेवाडी किंवा मेंढपाळ गुरांना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. मात्र मेंढपाळांच्या गुरांना जंगलात चराईसाठी पासेस मिळाव्यात, यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर होत आहे. या गुरांच्या चराईसाठी पासेस देताना वनविभागाला उत्पन्नसुध्दा मिळते. मात्र काठेवाडी आणि मेंढपाळांची गुरे जंगलात चराई करीत असल्याने वनक्षेत्र झपाट्याने नष्ट होत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. ही गुरे काही कालावधीसाठी जंगलात येत असून स्थानिक गावकऱ्यांच्या गुरांना चारा मिळणे दुरापास्त होते. एवढेच नव्हे तर काठेवाडी आणि मेंढपाळांची गुरे ही व्यावसायिक असल्याने जंगल नष्ट करण्यात आघाडीवर राहतात, असा कयास वनविभागाने लावला आहे. मेंढपाळांच्या गुरांनी जंगलात एकदा चराई केली की, त्या ठिकाणी पुन्हा चारा उगवत नाही, असा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. त्यामुळे जंगलाचे संरक्षण आणि वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने काठेवाडी व मेंढपाळांच्या गुरांना वनक्षेत्रात चराईला मनाई केली आहे. परंतु स्थानिकांना न्याय देण्याची भूमिका घेत वनवर्तुळ अधिकाऱ्यांना राजकीय मंडळींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: 'No-Entry' for Wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.