अचलपूर कोविड रुग्णालयात नाही पिण्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:56+5:302021-03-17T04:14:56+5:30
‘अमृत’चा पाणीपुरवठा खंडित, आरओ बंद, नगर परिषदेचे दुर्लक्ष, वापरायचे पाणी पिण्याला परतवाडा : अचलपूर डेडिकेटेड कोविड रुग्णालयासह ट्रामा केअर ...

अचलपूर कोविड रुग्णालयात नाही पिण्याचे पाणी
‘अमृत’चा पाणीपुरवठा खंडित, आरओ बंद, नगर परिषदेचे दुर्लक्ष, वापरायचे पाणी पिण्याला
परतवाडा : अचलपूर डेडिकेटेड कोविड रुग्णालयासह ट्रामा केअर युनिटमधील कोविड आयसीयूत दाखल कोरोना संक्रमित रुग्णांना आठ दिवसांपासून पिण्याचे शुद्ध पाणीच मिळालेले नाही. काही रुग्ण ऐपतीप्रमाणे बाहेरुन सिलबंद पाणी मागवित आहेत, तर काहींना बोअरचे वापरायचे पाणी प्यावे लागत आहे. कार्यरत डॉक्टर, कर्मचारी व इतरांना कॅनचे पाणी मागवावे लागत आहे.
अचलपूर कोविड रुग्णालयात ३५ बेड, तर ट्रामा केअर युनिटमध्ये १५ बेडचे आयसीयू आहे. अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने उग्र रूप धारण केले आहे. या रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या कोरोना संक्रमितांची संख्या वाढीवर आहे. दरम्यान, या रुग्णालयात व आयसीयूमध्ये दोन स्वतंत्र आरओ आहेत. रुग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अचलपूर पाणीपुरवठा अंतर्गत अमृत योजनेतील नळाची जोडणी या ठिकाणी देण्यात आली आहे. पण, आठ दिवसांपासून या रुग्णालयाचा अमृतचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे या पाण्याअभावी रुग्णालयातील दोन्ही आरओ बंद पडले आहेत. रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता संबंधित आरोग्य यंत्रणेने अचलपूर नगर परिषदेच्या अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधला. पण, आश्वासनापलीकडे त्यांना काहीही उत्तरे मिळालेले नाही. आठ दिवसांत एकदाही हा पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. पाण्याअभावी कोरोना संक्रमित रुग्णांचे हाल होत आहेत.
कोट
रुग्णालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या अमृत योजनेच्या पाईपलाईनवरील पाण्याचे प्रेशर डाऊन झाले होते. अमृतचा पाणीपुरवठा बंद नसून, सुरूच आहे.
- मिलिंद वानखडे, अभियंता, नगरपालिका, अचलपूर
कोट
कोविड रुग्णालयातील अमृत योजनेचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून खंडित आहे. नळाला पाणीच येत नाही. त्यामुळे रुग्णालयातील आरओ बंद पडले आहेत. बोअरचे पाणी प्यायले जात आहे.
- आरोग्यप्रमुख, कुटीर रुग्णालाय, अचलपूर