वन विभागाच्या परीक्षेत ‘आयएफएस’ अधिकारीच नापास!
By गणेश वासनिक | Updated: June 8, 2023 18:16 IST2023-06-08T18:13:29+5:302023-06-08T18:16:01+5:30
मराठीची ॲलर्जी : १६ पैकी ९ अधिकाऱ्यांना अपयश, पुनर्परीक्षा देण्याची संधी

वन विभागाच्या परीक्षेत ‘आयएफएस’ अधिकारीच नापास!
अमरावती : यूपीएससी अंतर्गत भारतीय वनसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र कॅडरमध्ये स्थान मिळविणारे नऊ आयएफएस अधिकारी महाराष्ट्र वन विभागाने घेतलेल्या विभागीय परीक्षेत नापास झाल्याने या विषयाची वन खात्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
वन विभागाच्या संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण उपविभागाने आयएफएस, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची जानेवारी २०२३ मध्ये विभागीय परीक्षा घेतली होती. सरळ सेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांना वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण करणे क्रमप्राप्त होते. विशेष म्हणजे वन विभागातील कामकाज, कायदे अधिनियम, नियम या दैनंदिन कार्यावर एकूण ४ पेपर घेण्यात आले होते. या परीक्षेत पुस्तक बघून त्यातील उत्तर प्रश्नपत्रिकेत लिहिण्याची मुभा होती. तरीही आयएफएस आणि महाराष्ट्र वनसेवेतील ९ अधिकारी नापास झाल्याचा निकाल जाहीर झाला आहे.
विभागीय परीक्षेत नापास झालेल्या अधिकाऱ्यांना पुनर्परीक्षा देण्याची संधी असली तरी नापास आयएफएस अधिकारी मात्र पेपर तपासणी करणाऱ्यांवरच दोष देताना दिसून येत आहेत. पेपर तपासणी करणाऱ्यांच्या लेखी मात्र यूपीएससी पास होणारे नापास झाल्याचे स्पष्ट होते.