जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता वाढीसाठी नवा प्रयोग
By Admin | Updated: September 2, 2014 23:25 IST2014-09-02T23:25:13+5:302014-09-02T23:25:13+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांची ढासळत चाललेली गुणवत्ता वाढविण्यासाठी ई-लर्निंग कृतीयुक्त अध्ययन, मोफत गणवेश, दप्तरे यासारख्या योजना निष्प्रभ ठरत असताना योजनांच्या यादीत आता गुणवत्ता कलाची

जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता वाढीसाठी नवा प्रयोग
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांची ढासळत चाललेली गुणवत्ता वाढविण्यासाठी ई-लर्निंग कृतीयुक्त अध्ययन, मोफत गणवेश, दप्तरे यासारख्या योजना निष्प्रभ ठरत असताना योजनांच्या यादीत आता गुणवत्ता कलाची नव्याने भर पडली आहे.
मुलांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम यांची माहिती संकलीत करून प्रत्येक योजनेची सद्यस्थिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही नवी योजना जिल्हा परिषदेत आकार घेत आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी आदेश दिल्याप्रमाणे कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून येत्या दोन महिन्यात जिल्हा परिषदेत कक्ष स्थापन केला जाणार आहे.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती दयनीय झाली आहे. शाळांची गुणवत्ता सातत्याने ढासळत चालली आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व मुलांना गुणवत्तेत वाढ करण्यासाठी जि. प. स्तरावर गुणवत्ता कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुणवत्तेत वाढ करण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम शासनाचे आदेश यांची माहिती येथे गोळा केली जाणार असून तत्काळ उपलब्ध केली जाणार आहे. कोणत्या योजनेची काय स्थिती आहे, काय अडचणी येत आहेत, त्यामध्ये काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याची माहीती वरिष्ठांनाही दिसणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त स्तरावरूनही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वेगाने काम करण्यात येऊन कक्ष स्थापण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)