अमरावतीत वाळू साठ्यांचे नवे ‘अर्थकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:39+5:30

जिल्ह्यातील वाळूघाट लिलाव प्रक्रियेत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून बनावट पासद्वारे मालवाहू ट्रकने क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणली जात आहे. खुल्या जागेवर वाळू साठवून ठेवता येत नाही. परंतु, शहरात जागोजागी खुल्या जागेवर वाळूचे साठे हे कुणाच्या आशीर्वादाने ठेवले जातात, हे सर्वश्रुत आहे. वाळू तस्करीसाठी अत्यावश्यक सेवा पासचा वापरसुद्धा करण्यात येत आहे.

New 'Economics' of sand deposits in Amravati | अमरावतीत वाळू साठ्यांचे नवे ‘अर्थकारण’

अमरावतीत वाळू साठ्यांचे नवे ‘अर्थकारण’

ठळक मुद्दे महसूल विभागाची चुप्पी : सेवा पासचा गैरवापर, कन्हान वाळूची शहरात तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात वाळूघाटांचे लिलाव व्हायचे आहेत. मात्र, शहरात कन्हान वाळू तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाळू साठवून ठेवता येत नसताना तस्करांकडून खुल्या जागेचा वापर करून ती ठेवण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी असताना वाळू तस्करीला उधाण आले आहे. महसूल, पोलिसांकडून ‘तेरी भी चूप - मेरी भी चूप’ असा प्रकार सुरू आहे.
जिल्ह्यातील वाळूघाट लिलाव प्रक्रियेत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून बनावट पासद्वारे मालवाहू ट्रकने क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणली जात आहे. खुल्या जागेवर वाळू साठवून ठेवता येत नाही. परंतु, शहरात जागोजागी खुल्या जागेवर वाळूचे साठे हे कुणाच्या आशीर्वादाने ठेवले जातात, हे सर्वश्रुत आहे. वाळू तस्करीसाठी अत्यावश्यक सेवा पासचा वापरसुद्धा करण्यात येत आहे. कन्हान वाळू तस्करीसाठी चौदा, सोळा चाकांच्या ट्रकचा वापर होत आहे. पाऊस सुरू होताच वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात साठा करुन ठेवला. पहाटेच ही वाळू शहरात आणली जात असून, खुल्या जागांवर ती ठेवण्यात येते. आॅर्डरनुसार बांधकामावर लहान ट्रकद्वारे पोहचविण्याचा धंदा सुरू आहे. कन्हान वाळू तस्करीत ‘भाईगिरी’ बळावली, हे विशेष.

मकोका अंतर्गत तडीपारीची कारवाई का नाही
शासनाने वाळू माफियांविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वाळू तस्करांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले आहेत. परंतु, आतापर्यंत एकाही वाळू तस्कराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी मकोका अंतर्गत तडीपारीची कारवाई करता येते. परंतु, याबाबत कोणीही हिंमत दाखवली नाही.

या भागात वाळू साठे
वलगाव मार्ग, टॉवर लाइन, वडाळी, साईनगर ते अकोली मार्ग, चांदूर रेल्वे मार्ग, रहाटगाव रिंग रोड, कठोरा मार्ग, रामपुरी कॅम्प, विलासनगर, भानखेडा मार्ग, यशोदानगर, फ्रेजरपुरा, बिच्छु टेकडी विट भट्टी परिसर, वडरपुरा, भातकुली मार्ग, बडनेरा.

महसूल प्रशासन कोरोना प्रतिबंधित उपाययोजनांना जास्त प्राधान्य देत आहे. खुल्या जागेवर वाळू साठे करता येत नाही. तरीदेखील खुल्या जागांवरील वाळू साठ्यांविरुद्ध ठोस कारवाईसाठी विशेष मोहीम राबविली जाईल.
- संतोष काकडे
तहसीलदार, अमरावती.

Web Title: New 'Economics' of sand deposits in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू