शहानूरच्या पाण्यावर शेजारच्या तालुक्याचा डोळा
By Admin | Updated: April 29, 2016 00:19 IST2016-04-29T00:19:00+5:302016-04-29T00:19:00+5:30
यावर्षी सर्वच जलाशयांची पातळी झपाट्याने खालावली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या सरासरी १७ टक्केच पाणीसाठा आहे.

शहानूरच्या पाण्यावर शेजारच्या तालुक्याचा डोळा
धरणाची होणार का पाणेरी ? : मूर्तिजापूर, अकोटला पाणी देण्यावर मंथन
सुदेश मोरे अंजनगाव सुर्जी
यावर्षी सर्वच जलाशयांची पातळी झपाट्याने खालावली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या सरासरी १७ टक्केच पाणीसाठा आहे. यापेक्षाही भयावह परिस्थिती अकोला जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि अकोट ही शहरे कायम तहानलेली आहेत.
शहानूर धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या दर्यापूर आणि अंजनगाव तालुक्यांच्या सीमेवरील ही गावे संपूर्ण टँकर पुरवठ्यावर चालतात. यामुळे शहानूर पाणीपुरवठा योजनेतून या शहरांना पाणी देता येईल काय ? याची उच्च पातळीवर चाचपणी सुरूू असून तांत्रीकदृष्टया याबाबत शक्यता पडताळून पाहिली जात आहे. यामुळे सद्यस्थितीत या योजनेवर असलेला ताण वाढून ही योजनाच कोलमडून पडण्याची भिती आहे. राजकीय फायद्यासाठी या धरणाची 'पाणेरी' करण्याचा घाट उच्चपातळीवर चालू असल्याचे वृत्त आहे.
१५६ गावे आणि दर्यापूर व अंजनगाव शहरांसोबतच वाढीव ७९ गावांना अविरत पाणीपुरवठा करणारे शहानूर धरण अतिरिक्त पाणीसाठा बाळगून आहे. इतर धरणे मृतप्राय झाली असतानासुद्धा या धरणात सद्यस्थितीत ४५ टक्के पाणी टक्केवारी आहे. गेल्या आॅगस्ट अखेर धरणात ३८ दशलक्ष घनमीटर पाणी होते. गेले आठ महीने त्यातील १८ दशलक्ष घनमीटर पाणी संपले तरी अजूनही २१ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. नेमक्या याच सौद्यामुळे या धरणातील पाणी शेजारच्यांना खुणावत आहे. या धरणातील पाणी मूर्तिजापूरपासून अवघ्या दहा किमी. अंतरावरील टाकळीपर्यंत जाते. कारला-काडगव्हाण मार्गावर धामणगाव चोरे हे गाव अकोट तालुक्यात येते. पण या गावाला शहानूर धरणातून पाणी पुरवठा होतो. यासाठी निमखेड आडे या अंजनगाव तालुक्यातील गावच्या नावाने रेकॉर्डवर पाण्याची टाकी आहे. टाकळीला मूर्तिजापूर जोडता येईल काय? याचासुध्दा वारंवार विचारविनिमय केला जात आहे.
मूर्तिजापूरला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. रोज दहा टँकर नागरिकांना न.प.पुरविते काटेपूर्णा धरणातून अनियमित पाणी येते. या तालुक्यातील रोहणा गावानजीकच्या उमा बॅरेज प्रकल्प रखडल्याने अजून तीन वर्षे हीच परिस्थिती राहील. अकोटचेही तेच हाल आहेत. पण नजीकचा बोर्डी नाला प्रकल्प पूर्ण व्हायला अवकाश आहे. वाण धरणातून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अकोटचे लोक पाण्यासाठी रात्रभर जागे असतात. त्यातूनच शहानूर धरणाकडे या शेजारच्या तालुक्यांची वक्रदृष्टी वळलेली आहे.