फोनवरून बोलण्यासाठी करावी लागते ‘वीरुगिरी’
By Admin | Updated: September 26, 2015 00:01 IST2015-09-26T00:01:16+5:302015-09-26T00:01:16+5:30
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी...

फोनवरून बोलण्यासाठी करावी लागते ‘वीरुगिरी’
योजनेचा बट्ट्याबोळ : दूरसंचार विभाग कुंभकर्णी झोपेत
नरेंद्र जावरे चिखलदरा
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मेळघाटातील एक गाव जागतिक पातळीवर लवकरच झळकणार आहे. दुसरीकडे आप्तस्वकीयांसोबत संवाद साधण्यासाठी नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून संवाद साधावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र तालुक्याच्या काटकुंभ येथील आहे. येथील बीएसएनएलचे टॉवर महिनाभरापासून चालू-बंद होत आहे.
तालुक्यातील काटकुंभ येथे भारत संचार विभागाचे मोबाईल टॉवर आहे. यामुळे परिसरातील ५२ गावांपैकी किमान ८ ते १० गावांत मोबाईल नेटवर्क होते. परंतु महिनाभरापासून बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. लाखो रूपयांचे टॉवर निकामी झाल्याने ते पांढरा हत्ती ठरले आहे. या टॉवरकरिता आवश्यक यंत्रसामग्री कालबाह्य झाल्याने ते बंद पडून आहे. यासंदर्भात युवक काँग्रेसचे महासचिव राहुल येवले, पीयूष मालवीय, गौरव काळे, अमोल बोरेकार आदी पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिले. मात्र त्यावर एक महिन्याचा कालावधी लोटत असून कुठल्याच प्रकारची कार्यवाही संबंधित विभागाने केली नाही. परिणामी परिसरातील आदिवासींमध्ये शोभेची वास्तू ठरलेल्या टॉवरविरुद्ध संताप खदखदत आहे.
पोटासाठी आवश्यक झाला मोबाईल
जीवनावश्यक वस्तूप्रमाणेच दररोजच्या जीवनात मोबाईल आवश्यक झाला असताना मेळघाटातील आदिवासींच्या पोटासाठी अनिवार्य झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोटासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासींच्या हाताला मेळघाटात काम नसल्याने ते दुसऱ्या शहरात पाठीवर बिऱ्हाड घेऊन निघतात, आवश्यक कामाच्या ठिकाणी जावे लागण्यासाठी त्यांनी संबंधित मजुरांच्या दलालास आपला मोबाईल क्रमांक दिला आहे. परंतु काटकुंभ येथील सेवा ७ महिन्यांपासून बंद असल्याने त्यांच्या पोटाचा प्रश्न या बंद टॉवरमुळे ऐरणीवर आला आहे. रोजंदारीच्या कामासह इतर आवश्यक संवाद आप्तस्वकियांसोबत साधणे बंद झाले आहे.
टॉवरवर चढून वीरूगिरी
काटकुंभ येथील मुख्य चौकात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. ७ महिन्यांपासून बीएसएनएल सेवा बंद असल्याने नागरिकांना या टाकीच्या पाऱ्यांवर चढून संवाद साधावा लागत आहे. लगतच्या भैसदेही, बैतूल (मध्य प्रदेश) चे नेटवर्क येथे लागते, तर कुठे उंच टेकडीवर चढावे लागते. त्यानंतर संवाद साधला जातो. यात मात्र पलिकडून फोन आल्यास रोमिंगचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. त्यापेक्षा स्वत:च बोलणे पसंद करतात. पाण्याची टाकी संवाद साधण्याचे केंद्र ठरले आहे.