राष्ट्रवादीला ५० टक्के जागा हव्याच!
By Admin | Updated: July 20, 2014 23:58 IST2014-07-20T23:58:17+5:302014-07-20T23:58:17+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. ही मागणी वरिष्ठांची असून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मागणी पूर्ण होईल,

राष्ट्रवादीला ५० टक्के जागा हव्याच!
पत्रपरिषद : अनिल देशमुख यांची माहिती
अमरावती : येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह आहे. ही मागणी वरिष्ठांची असून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मागणी पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी येथील शासकीय विश्राम भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
अनिल देशमुख हे अकोला येथे जात असता त्यांनी अमरावतीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मतदारसंघनिहाय चर्चा करताना कोणता मतदारसंघ प्राधान्यक्रमाने राष्ट्रवादीच्या वाट्याला मागावा याविषयी पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले.
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्चित आहे. २८८ पैकी १४४ जागा या राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळाव्यात ही मागणी वरिष्ठांची आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या खासदारांच्या संख्येत महाराष्ट्रात वाढ झाली आहे. या मूल्यमापनानुसार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला निम्म्या जागा मिळायलाच पाहिजे. २३ जुलै रोजी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींंची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मागणीनुसार जागा वाटपाचे सूत्र ठरविले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. अमरावतीत १८ जुलै रोजी होणारा निर्धार मेळावा का रद्द करण्यात आला, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ते म्हणाले, निर्धार मेळावा हा संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात आला होता. काही तांत्रिक कारणांमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला. जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा असून काही नावांवर मंथन सुरु आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत ही नावे घोषित केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अ. रवी राणा, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, विजय भैसे, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, नितीन हिवसे, गणेश राय, सुनील काळे, संतोष महात्मे, चंद्रशेखर देशमुख, शरद तसरे, सपना ठाकूर, प्रवीण मेश्राम, अनिल ठाकरे, नीलिमा महल्ले आदी उपस्थित होते.