‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
By गणेश वासनिक | Updated: May 12, 2025 14:04 IST2025-05-12T14:04:14+5:302025-05-12T14:04:45+5:30
Amravati : मुंबईच्या खार पोलिसात तक्रार दाखल, ‘तू हिंदू शेरनी आहे’ आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार

Navneet Rana receives death threat from Pakistan for mentioning 'Sindoor'
गणेश वासनिक
अमरावती : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. भारताकडून ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सिंदूरचा उल्लेख करत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा या सध्या मुंबईत आहेत. रविवारी मध्यरात्री त्यांना पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून हे कॉल आले आहेत.
‘ना सिंदूर राहील, ना सिंदूर लावणारी’ तुझी सर्व माहिती आमच्याकडे आहे. तू हिंदू शेरनी आहे. आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार आहे. त्यामुळे ना सिंदूर राहणार ना सिंदूर लावणारी, अशी धमकी पाकिस्तानातून आलेल्या कॉलवर नवनीत राणा यांना देण्यात आली आहे.
खार पोलिस ठाण्यात तक्रार
थेट पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने नवनीत राणा यांनी मुंबईतील खार पोलीस ठाणे गाठले आहे. तर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे. याबाबत काही वेळात सविस्तर माहिती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवनीत राणा यांना वाय दर्जाची सुरक्षा
नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार असताना त्यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता काही महिन्यांपूर्वी हैदराबाद येथून एका पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली होती. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. पाकिस्तानातून मिळालेल्या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली. खार पोलिस ठाण्यात तक्रार देताना नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती रवी राणा हेदेखील उपस्थित आहेत.