राष्ट्रीय महामार्ग खिळखिळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:00 IST2020-09-03T05:00:00+5:302020-09-03T05:00:02+5:30
शासनाच्या लेखी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. पाच वर्षे रस्त्याची देखभाल कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कंत्राटदार नॉट रिचेबल तर, यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी सुद्धा गायब झाल्याची ओरड आहे . वाहने अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातामध्ये दुभाजकावरील लोखंडी कठडे तुटले आहे.

राष्ट्रीय महामार्ग खिळखिळा !
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/जरूड : वरुड अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ खिळखिया झाला आहे. या महामार्गावर उभारलेले पथदिवे बंद आहेत. तर दुभाजकावरील कठडे तुटून पडले आहेत. हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे.
शासनाच्या लेखी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. पाच वर्षे रस्त्याची देखभाल कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कंत्राटदार नॉट रिचेबल तर, यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी सुद्धा गायब झाल्याची ओरड आहे . वाहने अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातामध्ये दुभाजकावरील लोखंडी कठडे तुटले आहे. दोन महिने लोटूनही दुरुस्ती करण्यात आली नाही. तर पथदिवे सुद्धा बंद आहेत. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. देखभाल करणारी कंपनी करते तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याचे वाटोळे होत आहे.
सन २०१८ मध्ये नांदगाव पेठ ते जलालखेडा नागपूर आणि पांढुर्णा मध्यप्रदेश सीमेपर्यंत हा तीनपदरी सिमेंटचा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. सदर रस्त्याच्या निर्मितीसोबतच पुढील पाच वर्षे या महामार्गाची देखभाल सुद्धा कंपनीला करावयाची आहे. सहा महिन्यातच रस्त्याला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते दबल्या गेले आहेत. तर रस्त्याच्या कडा सुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत.
सुविधा गायब, कार्यालयही नाही
राष्ट्रीय महामार्ग असल्याने कंपनीकडून या मार्गावर रुग्णवाहिका, क्रेन, टो व्हॅन ठेवणे बंधनकारक आहे. एवढेच काय तर कंपनीचे किंवा महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय सुद्धा येथे नाही. यामुळे नागरिकांनी तक्रार कुणाकडे करावी? हा प्रश्न आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे मौन संशयाला खतपाणी देणारे आहे. पुसला रस्त्यावर मधोमध जीवघेणा खडडा पडला. अनेक दुचाकी त्या खड्ड्यात आदळून अपघातग्रस्त झाल्या. वरुड शहरात शुद्ध तीच परिस्थिती आहे. कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा प्रश्न वरूडकरांनी उपस्थित केला आहे.