National flag hoist in wrong direction at Brahmanwada Thadi in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे फडकविला उलटा तिरंगा

अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे फडकविला उलटा तिरंगा

ठळक मुद्देप्रशासकांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्नध्वजारोहणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना प्रशासक व सचिवांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात आला. याप्रकरणी काही नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला. मात्र, प्रशासकाला प्रकरण दाबण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.

शासनाने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याकरिता ध्वजसंहिता निश्चित केली आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण नियमानुसार होणे गरजेचे आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने आशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असाच प्रकार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात घडला.

ग्रामपंचायतचे प्रशासक व विस्तार अधिकारी नारायण आमझरे यांनी ध्वजारोहण केले असता. चक्क राष्ट्रध्वज उलटा फडकल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रगीतसुद्धा झाले. ही बाब नंतर उपस्थितांच्या लक्षात येताच उलट फडकलेला तिरंगा खाली उतरवून पुनश्च फडकविण्यात आला. प्रशासकाच्या या गलथान कारभाराविरुद्ध गावातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढाकार घेतला होता. मात्र, प्रशासक व ग्रामसेवकांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसली तरी ग्रामपंचायतीवर ध्वजारोहण करताना उलटा तिरंगा फडकल्याचे छायाचित्र तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ध्वजारोहणावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, गणमान्य उपस्थित होते. याप्रकरणी विचारणा केली असता, ब्राह्मणवाडा थडीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी कोणतीही तक्रार झाली नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकाराबाबत पंचायत समिती प्रशासनात एकच तारांबळ उडाली होती. प्रशासक व सचिवांच्या हलगर्जीपणामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील की, पाठराखण याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: National flag hoist in wrong direction at Brahmanwada Thadi in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.